श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावणी सोमवार मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील शिवालये गजबजून गेली होती.शिवालयांमधून शेवटचा श्रावणी सोमवार निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिषेक महाआरती पानाफुलांची सजावट याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रावण सोमवार पार पडला. विविध शिव मंदिरात दर्शनासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे शिवनामाचा जयघोष करत शहरातील शिवमंदिरांमधून श्रावणी सोमवार मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला.
बेळगावचे दक्षिण काशी समजले जाणारे कपिलेश्वर मंदिर असो की बेळगावचे केदारनाथ मानले जाणारे कणबर्गी येथिल सिद्धेश्वर मंदिर ही शिवालय भक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त संपूर्ण मंदिर आकर्षकरीत्या विद्युत रोषणाई विविध फुलांपानांनी सजविण्यात आले होते.
विशेषतः दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे रात्रीपासूनच भक्तांकडून दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली जात होती यामुळे सदर परिसराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून पंचामृत अभिषेक पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यात आला.त्यानंतर एकादश रुद्राभिषेक करण्यात आला. श्रावण सोमवार निमित्त मंदिरामध्ये त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी पालखी प्रदक्षिणा करून महाआरती करण्यात आली.
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिरातील महाप्रसाद रद्द करण्यात आला होता.मात्र यावर्षी सालाबाद प्रमाणे शेवटच्या श्रावणी सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यामुळे डोंगर परिसर फुलून गेला होता.भक्तांच्या लांबच लांब रांगा आणि शिवमय वातावरणामध्ये हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शिवशंभू चा जयघोष करत भक्त सिद्धेश्वर चा डोंगर चढून जात होते. भक्तांच्या अलोट गर्दीमुळे एरवी शांत असणारा सिद्धेश्वर डोंगर परिसरात जणू भक्तांच्या गर्दीचा महापूर आला होता.
जणू यात्राच….
शेवटचा श्रावणी सोमवार विविध शिवालयांचा जणू यात्रेचा दिवसच. यामुळे शिवमंदिरे गजबजुन गेली होती शिवाय मंदिरांच्या बाहेरील बाजूला लावण्यात आलेले स्टॉल आणि नागरिकांची गर्दी यामुळे शिवालय आवारात यात्रा भरली असल्याचे दिसून आले.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे श्रावण सोमवार देखील साध्या पद्धतीनेच साजरे करण्यात आले होते. आता कोरोनाचे सावट दूर होताच नेहमीप्रमाणे शिवालय मधून शेवटच्या श्रावणी सोमवारी यात्रा भरल्याचे दिसून आले.
शिवमंदिरे गर्दीने फुलली
शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त शहरातील शिवमंदिरे गर्दीने फुलली|Belgaum Live|
बेळगावचे केदारनाथ म्हणून ख्यात असलेल्या कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी pic.twitter.com/zgSIBfkDAv
— Belgaumlive (@belgaumlive) August 22, 2022