रविवारपासून पुन्हा पावसाने दम्डाज हजेरी लावली असून संततधार पावसामुळे शहर परिसरात जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. पावसाचा वाढत ओघ पाहून आज जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असून शहरात अनेक ठिकाणी घरांची, झाडांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
भारत नगर चौथा क्रॉस येथील विणकर आनंद बिर्जे यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले. घराची पडझड अशा पद्धतीने झाली आहे कि, या घराशेजारी असलेल्या घरचेही मोठे नुकसान झाले आहे.
बिर्जे यांचे घर कोसळल्याने घराशेजारी थांबलेल्या वाहनांचे नुकसान होऊन या घटनेत एक महिला देखील जखमी झाली आहे.
आनंद बिर्जे यांच्या घराशेजारी असलेल्या पांडुरंग वाईंगडे यांच्या घराचेही यात नुकसान झाले असून पांडुरंग वाईंगडे यांच्या २ मारुती व्हॅन, ४ दुचाकींचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर शांता वाईंगडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
रविवारी सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून शहरात अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र सुरूच आहे. काल सकाळपासून थोडीही उसंत न घेता मुसळधार पावसाने शहर परिसरातील अनेक सखल भागात पुन्हा पाणी साचले आहे.