श्री गणेशोत्सवासाठी शहर उपनगरातील रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी, फिरत्या निर्माल्य कुंडाची व्यवस्था, मोबाईल टॉयलेटसह पिण्याच्या पाण्याची सोय आदी विविध मागण्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावने केल्या असून त्या संदर्भातील निवेदन आज मंगळवारी जिल्हाधिकारी तथा मनपा प्रशासक, पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना सादर करण्यात आले.
बेळगाव सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासक नितेश पाटील यांची भेट घेऊन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. शहर व उपनगरातील रस्त्यावरील खड्ड्यांची तात्काळ माती मिश्रण, मुरूम न घालता सिमेंट पेव्हर्स घालून रागडूजी केली जावी. मंडप परिसर व त्या ठिकाणी जोडणारे सर्व संपर्क रस्ते स्वच्छ ठेवावेत. सर्व मंडप परिसर व मिरवणूक मार्गावरील रस्त्यावर आडव्या आलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारा उंच करून द्याव्यात. वनाखात्यातर्फे रस्त्यावर आडव्या येणाऱ्या फांद्या छाटण्यात याव्यात. शहरातील प्रमुख रस्त्यावर व चौकांमध्ये विद्युत रोषणाईसह प्रखर हॅलोजन लॅम्प बसवण्याबरोबरच गणेशोत्सव काळात शहरात ठीक ठिकाणी स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची (मोबाईल टॉयलेट) व्यवस्था केली जावी. त्याचप्रमाणे ठीक ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी.
नागरिकांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत उपाहारगृहे खुली ठेवण्याची मुभा द्यावी. रस्त्यावरील अनावश्यक विद्युत व दूरध्वनी खांब हटविण्याबरोबरच अन्य अडथळे दूर करावेत. उघड्या गटारींवर फरशा घातल्या जाव्यात, विशेष करून रामदेव गल्लीमध्ये याची आवर्जून अंमलबजावणी केली जावी. विसर्जन तलावांच्या ठिकाणी श्रीमूर्ती विसर्जनासाठी पाटासहित हायड्रोलिक क्रेन, ध्वनिक्षेपक, जलतरणपटू, सुरक्षा रक्षक व भाविकांसाठी प्रेक्षक गॅलरी इत्यादी सुविधांची व्यवस्था केली जावी. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप आणि घराघरातील निर्माल्य संकलनासाठी प्रभाग वार फिरत्या निर्माण कुंडाची व्यवस्था केली जावी.
अनंत चतुर्दशी दिवशी 9 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक मार्गावरील कॉलेज रोडवरील यंदे खूटपासून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत प्रशस्त प्रेक्षक गॅलरी उभारण्यात यावी. मिरवणूक मार्गाची दुरुस्ती करण्याबरोबरच या मार्गावरील गतिरोधक तात्पुरते हटवण्यात यावेत. मिरवणूक मार्गावरील रुंदीकरण झालेल्या रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली आदी प्रमुख रस्त्यांवरील दगड -मातीचे ढिगारे हटवून अर्धवट गटार बांधकाम व रस्ता डांबरीकरण इत्यादी विकास कामे त्वरित हाती घेऊन पूर्ण करावीत. जिल्हा प्रशासनाच्या श्री गणेश हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांकाची व्यवस्था करून प्रत्येक उत्सव मंडळाला अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांकाची यादी द्यावी. या सर्व मागण्यांची पूर्तता करून जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव सण सर्वांच्या सहकार्याने उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी महामंडळाच्या कार्यास हातभार लावावा. त्यासाठी संबंधित नमूद मागण्याची लवकरात लवकर पूर्तता केली जावी अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
महापालिका आयुक्त डॉ रुद्रेश घाळी यांच्या गैरहजेरीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त मागण्यांचे निवेदन मनपा उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांना सादर केले. त्याने आयुक्तांच्यावतीने तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या मुख्य कार्यकारी अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांना देखील हे निवेदन सादर करून रस्त्यांची डागडुजी गटारीवरील फरशा गतिरोधक हटविणे वगैरे सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंधित मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी अशी विनंती करण्यात आली. याखेरीज पोलीस आयुक्तांना देखील उपरोक्त निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादरकरतेवेळी सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या समवेत कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी आणि स्वागताध्यक्ष मदन बामणे उपस्थित होते.