गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसावर येऊन ठेपला असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. विद्येची देवता असणाऱ्या बाप्पाच्या भक्तांमध्ये प्रामुख्याने शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच आता शाळा स्तरावर परीक्षेचा फिव्हर दिसून येत आहे. यामुळे एका बाजूला गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना शालेय विद्यार्थी मात्र परीक्षेत व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या महिन्यातच सहामाही परीक्षा पार पडल्या होत्या. मात्र आता सलग दुसऱ्या महिन्यात देखील शुक्रवारपासून शाळा स्तरावर परीक्षा सुरू झाल्या आहेत.
सदर परीक्षा मंगळवारपर्यंत सुरु राहणार असून परीक्षा देऊनच बुधवारी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी विद्यार्थी सज्ज होणार आहेत. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांना सदर परीक्षांचे पेपर घरी बसूनच सोडविण्याची वेळ आली होती. मात्र प्रत्येक महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करत घटक निहाय नियोजन होणाऱ्या सदर परीक्षा यंदा सुरळीतपणे पार पडत आहेत.
घरगुती स्वरूपात शिवाय सार्वजनिक स्वरूपात देखील गणेशोत्सव साजरा केला जातो. अनेक शाळांमधून देखील गणपती आणला जातो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्सवाचा उत्साह द्विगुणीत केला जातो .यामुळे गणेशोत्सवाची पूर्वतयारी सुरू असताना परीक्षामध्ये व्यस्त असणारे विद्यार्थी बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत. मात्र गणपती बाप्पाच्या स्थापनेपूर्वी आपली परीक्षा संपणार असून गणेशोत्सवात मोठी धमाल करता येणार याचा उत्साह देखील विद्यार्थ्यांमध्ये ओसंडून वाहत आहे.