निरनिराळ्या गोष्टी आजमावल्या जात आहेत आणि आपल्याला नवी कल्पना सुचली असे प्रत्येकालाच वाटत आहे. यापैकी किती जणांना पूर्वाअनुभव आहे देव जाणे. त्यामुळे बिबट्याच्या बाबतीत प्रशासन आणि संबंधित खात्यावर विनोद करणे त्यांची खिल्ली उडवणे बंद झाले पाहिजे. यामुळे परिस्थिती अधिकच चिखळण्याखेरीज दुसरे काहींही निष्पन्न होणार नाही.
बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या प्रशासन आणि संबंधित खात्याच्या बाबतीत जनतेने टीकाटिप्पणी अथवा विनोद करणे कृपया थांबवावे. जंगली हिंस्र बिबट्याला शोधून पकडणे सोपे काम नाही. गेल्या अनेक दिवसापासून हा बिबट्या गोल्फ कोर्स मैदान परिसरातील जंगलात वास्तव्यास असल्यामुळे आतापर्यंत आपल्यापेक्षा जास्त तो त्या भागाशी परिचित झालेला आहे.
त्यामुळे सध्या परिस्थितीत बिबट्या स्वतःहून माघारी परत जाईल इतकीच आशा बाळगणे आपल्या हातात आहे. आपल्याला धोका आहे अथवा आपल्या पिलांना धोका आहे असे वाटल्याखेरीज बिबटे कधीही मनुष्याच्या वाटेला जात नाहीत.
बाष्कळ विनोद आणि आरोपांमुळे बिबट्याला शोधून पकडणे हा विनाकारण प्रतिष्ठेचा मुद्दा होण्याखेरीज काहीही निष्पन्न होणार नाही. त्याखेरीस विनोद आणि आरोपांमुळे योग्य निर्णय घेण्यात हस्तक्षेप केल्यासारखे होणार आहे. यासाठी सदर प्रकार तात्काळ थांबविले जावेत. बिबट्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे गोष्टी आणखीनच अवघड होणार आहेत. विशेष करून बिबट्याची जर पिले असतील तर या प्रकारामुळे त्याच्याशी शत्रुत्व घेतल्यासारखे होईल आणि परिस्थिती अवघड होईल.
बिबट्याचा माग काढण्यासाठी शिकारी श्वानपथक का मागवण्यात आले माहित नाही. माग काढणारे श्वान पथक मागविले असते तर गोष्ट वेगळी होती शिकारी श्वान पथकांमुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोत्तम मार्ग एकच तो म्हणजे बिबट्या सोबत विशेष करून नागरी वसाहतीत वावरणाऱ्या बिबट्यासोबत काम केलेल्या, त्याचा पूर्वानुभव असलेल्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा, हे सद्य परिस्थितीत उचित ठरणार आहे.
समीर मजली-ग्रीन सेव्हियर्स,बेळगाव.