येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांनी आज सोमवारी चक्क बाईकवरून श्री विसर्जन मिरवणूक मार्ग आणि विसर्जन तलावाची पाहणी केली.
श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शहरातील ज्या प्रमुख मार्गावरून जाणार आहे त्या मार्गाची आज सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाहणी केली. बाईक अर्थात मोटरसायकल वरून केलेल्या या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी मिरवणूक व्यवस्थित पार पडावी याअनुषंगाने उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. सर्वप्रथम मिरवणूक मार्गावर पडलेले खड्डे बुजवून मार्ग निर्धोक करावा. रस्त्यावर खाली लोंबकळणाऱ्या विजेच्या उच्च दाबाच्या तारा सुरक्षित उंचीवर खेचून घेण्याबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात असे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
त्याचप्रमाणे वाहतूक मार्गात केलेल्या बदलांची वेळोवेळी जनतेला पूर्व सूचना दिली जावी. विसर्जन मिरवणुकीप्रसंगी अबालवृद्ध हजारो नागरिक उपस्थित रहात असल्यामुळे स्वच्छता आणि सुरक्षेची काळजी घेतली जावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून तो व्यवस्थित करण्याचे कार्य हाती घेण्यात आले असल्याचे सांगून सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
विसर्जन मिरवणूक मार्गाच्या पाहणीनंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कपिलेश्वर येथील विसर्जन तलावाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच मनपा आयुक्त डॉ. घाळी यांना आवश्यक सूचना केल्या. याप्रसंगी वरिष्ठ मनपा अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह अन्य अधिकारीवर्ग उपस्थित होता