Thursday, December 26, 2024

/

लवकरच भटक्या कुत्र्यांसाठी काळजी केंद्र

 belgaum

भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवा संदर्भातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेताना बेळगाव महापालिकेने अखेर भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम हाती घेतली आहे. आता लवकरच भटक्या कुत्र्यांसाठी काळजी केंद्रही भरण्यात येणार आहे.

प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश असलेल्या बिगर सरकारी संघटनेशी (एनजीओ) संलग्न दोन पथकांकडून सध्या शहराच्या विविध भागात भटक्या कुत्री पकडण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ म्हणाले की, बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचे कंत्राट यापूर्वीच बेंगलोर येथील ‘केअर फाॅर व्हॉइसलेस’ या एनजीओला देण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी बेळगाव महापालिका सदर एनजीओला प्रत्येकी 1590 रुपये देत आहे.

यातील 200 रुपये कुत्री पकडणाऱ्या पथकातील कामगारांना एखाद्या भागातील पकडलेली कुत्री नसबंदी नंतर पुन्हा त्या भागात सोडण्यासाठी दिले जात आहेत.

लवकरच भटक्या कुत्र्यांसाठी काळजी केंद्र (स्ट्रे डॉग केअर सेंटर) भरण्यात येणार आहे. या ठिकाणी रस्त्यावरील आजारी भटक्या कुत्र्यांवर उपचार केले जातील. याव्यतिरिक्त महापालिकेकडून भटकी कुत्री दत्तक केंद्र ही सुरू केले जाणार आहे. या केंद्रात भटक्या कुत्र्यांना अन्न व निवारा पुरवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतलेली जाईल.

श्वान प्रेमी या केंद्राला भेट देऊन आपल्या घरी पाळण्यासाठी एखादे आवडते कुत्रे दत्तक घेऊ शकतात. कुत्र्यांची आवड आहे मात्र ती घरी पाळता येणे शक्य नसलेले पशुप्रेमी एखादे कुत्रे दत्तक घेऊन केंद्रातील त्याच्या पालन पोषणाचा खर्च उचलू शकतात, असे डॉ. संजय डुमगोळ यांनी स्पष्ट केले.

एकंदर लवकरच शहरवासीयांची भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाची गेल्या अनेक वर्षापासूनची जी तक्रार आहे ती लवकरच दूर होणार आहे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.