Saturday, December 21, 2024

/

कॅम्प येथे तिहेरी अपघातात एक विद्यार्थी ठार, दोन जखमी

 belgaum

भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकी व कारला धडक दिल्यामुळे घडलेल्या तिहेरी अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार होण्यासह अन्य दोन विद्यार्थी जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना आज बुधवारी सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास कॅम्प फिश मार्केटनजीक घडली.

अरहान फारूक बेपारी वय 10  (रा. कॅम्प) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो इस्लामिया हायस्कूलमध्ये शिकत होता. कॅम्प येथे खानापूर रोडवर घडलेल्या सदर अपघातात फरहान याची बहिण अतिका अफसा आणि ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी आयुष सचिन आजरेकर हे दोघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अरहान आणि त्याची बहीण स्कुटीवरून जात होते.

त्यावेळी खानापूरकडून बेळगावकडे लोखंडी सळ्या भरून येणाऱ्या ट्रकच्या चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले. परिणामी कॅम्प फिश मार्केटनजीक ट्रकने समोर चाललेल्या अरहान याच्या स्कुटीसह एका कारला धडक दिली. त्यामुळे ट्रकखाली सापडून अरहान जागीच गतप्राण झाला, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली.Accident

अपघात घडताना आयुष आजरेकर हा विद्यार्थी चालत रस्ता ओलांडत होता. त्यामुळे तो देखील अपघातात सापडून जखमी झाला आहे. ट्रकने स्कुटीला धडक देण्याबरोबरच एका कारलाही ठोकल्यामुळे कारचे नुकसान झाले असले तरी त्यामधील कोणालाही गंभीर इजा झाली नाही. ट्रकच्या धडकेमुळे कार व स्कुटीचे नुकसान होण्याबरोबरच शेजारील घरांचेही नुकसान झाले आहे. अपघात घडताच घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी चिडलेल्या नागरिकांनी ट्रकच्या चालकाला ट्रकमधून बाहेर खेचून त्याची चांगलीच धुलाई केली.

अपघातानंतर कॅम्प परिसरातील संतप्त महिला व नागरिकांनी घटनास्थळी आंदोलन छेडून न्याय मिळावा अशी मागणी केली. अपघात स्थळी प्रचंड गर्दी झाल्यामुळे खानापूर रोडवरील वाहतूक बराच काळ ठप्प होऊन विस्कळीत झाली होती. उपरोक्त अपघाताची रहदारी दक्षिण विभाग पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

ट्रकने शाळकरी विद्यार्थ्याला चिरडले- अपघात सीसीटीव्हीत कैद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.