प्रत्येकाच्या मनात विराजमान असणाऱ्या गणरायाचे आगमन आता होणार आहे.बाप्पाची मनोभावे पूजा करत प्रत्येक जण गणेशोत्सव साजरा करतो.मात्र पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाईने बाप्पाची सेवा करत उत्सवाच्या पूर्वीच गणेशोत्सव साजरा केला आहे.
खानापूर तालुक्यातील हुलंद या गावी पर्यटनासाठी गेलेल्या महाद्वार रोड पहिला क्रॉस येथील ज्यूनिअर शिवाजी पार्क युवक मंडळच्या तरुणाईने त्या ठिकाणी दुरावस्थेत असणाऱ्या गणपती मंदिरांची उभारणी केली आहे.
खानापूर तालुका जंगलमय असल्याने त्या ठिकाणी निसर्गाचे सौंदर्य अनुभविण्यासाठी प्रामुख्याने तरुणाई नेहमी हजेरी लावते. अशाच पद्धतीने बेळगांव महाद्वार रोड पहिला क्रॉस येथील 15 मुले हुलंद या गावी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते.त्यावेळी त्या ठिकाणी असणारी दोन गणपतीची मंदिरे दुरावस्थेत असल्याचे दिसून आले.
तो भाग एकदम मागासलेला असल्याने परिस्थितीनुसार तेथील ग्रामस्थांनी लाकडे तसेच झाडांच्या फांद्या यांचा वापर करून गणपतीची मंदिरे उभारली होती.मात्र भर पावसात त्या ठिकाणी बरोबर गणपतीच्या अंगावरच पाणी पडत होते.ही बाब त्या तरुणांनी पाहिली आणि आपण ती मंदिरे उभारायचा असा निश्चय करत बेळगाकडे परतले.
केवळ पंधरा दिवसांवर गणेशोत्सव आला असताना आपण गणरायाची सेवा म्हणून ती मंदिरे उभा करूया असा निश्चय करत, त्यांनी हुलंद गावात जाऊन तेथील ग्रामस्थांची परवानगी घेतली. त्यांच्या परवानगीनुसार बेळगाव येथे येऊन पत्र्याचे मंदिर तयार करून ती दोन्ही मंदिरे दुरावस्थेत असलेल्या त्या मंदिरांच्या जागी उभी करण्यात आली.
दरवर्षी गणेशोत्सवात तेथील गणपतीचे पूजन केले जाते आणि पुढील वर्षी तो गणपती विसर्जित करून नवीन गणपती आणला जातो.अशा पद्धतीने त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत असतो.
यामुळे आता बुधवारी होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पूर्वीच तेथील मंदिरांची उभारणी करण्यात आली असल्याने केवळ 20 ते 25 घरांचे गाव असलेल्या त्या भागात आता गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
साधारण 50 ते 55 हजार चा खर्च करून ती दोन मंदिरे उभारण्यात आली आहेत. सदर मंदिर उभारणीसाठी नागेश मामा, सनी सुतार, बॉबी सुतार,विनायक जाधव,आदि जाधव ओंकार जाधव, रवी पवार, अभि पवार,ऋषी वेर्लेकर, शुभम पोटे, प्रशांत, वैभव पोटे,विशाल बाचुळकर, शिवम बाचुळकर मनोज नवलेकर, श्रीश झेरेकर, गणेश गोसडे ,राजू लोहार आतिष मंडोल,आशिष भांदुर्गे, ओमकार वाले यांनी प्रयत्न केले विनायक जाधव यांच्या पुढाकारातून सदर मंदिरे उभे करण्यात आली. यामुळें केवळ मौज मजा आणि पर्यटन म्हणून आपली भ्रमंती नसून समाजकार्य म्हणून केलेले तरुणाईचे हे कार्य नक्कीच इतरांसाठी आदर्श असे आहे.