बेळगाव लाईव्ह विशेष : बहुतांशी रस्त्यांचा दर्जा हा पावसाळ्यातच समजतो. डांबरीकरण, डागडुजी, नूतनीकरण, रुंदीकरण या सर्व विकासकामांदरम्यान रस्त्यांना मिळणारा नवा लूक हा भोंगळ कारभार आहे कि खरंच विकासाच्या दिशेने जात असलेले पाऊल आहे? हा प्रश्न आजतागायत सुटलेला नाही. पावसाळा आणि रस्त्यावरील खड्डे यांचे अतूट नाते आहे. पावसाळ्यात खड्डे पडणे स्वाभाविक असले तरी त्यानिमित्ताने महापालिकेच्या रस्त्याचा दर्जा कितपत आहे त्याचे पितळच उघडे पडत असते.
बेळगावमधील रस्त्यांची अवस्थाही आज अशाच परिस्थितीत आली आहे. रस्त्यांची दुरवस्था, मोठमोठे खड्डे, विकासाच्या नावावर सुरु असलेला भ्रष्टाचार, जनतेच्या पैशांचा चुराडा, यामागे सुरु असलेले अर्थकारण आणि अर्थकारणासाठी सुरु असलेले राजकारण! या साऱ्या गोष्टी एकमेकात गुंतल्या आहेत. बेळगावमध्ये एका आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा बळी गेला. यापूर्वी खड्ड्यांमुळे असे अनेक अनुचित प्रकार घडले आहेत. मात्र एका आठवड्यात ज्या पद्धतीने आणि ज्या कारणामुळे बेळगावमध्ये अपघात घडले त्या अपघातावरून बेळगावमधील प्रशासकीय कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभारले आहे.
गेल्या आठवड्याभरात फोर्ट रोड येथे सादिया पालेगार या १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला ट्रकने चिरडले तर कॅम्प येथे झालेल्या अपघातात अरहाण बेपारी याचा मृत्यू झाला. तीन दिवसात २ विद्यार्थ्यांचा बळी गेला असून याला जबाबदार कोण? असा सवाल नागरीकातून उपस्थित होते आहे.
स्मार्ट सिटीच्या दिशेने झेपावणाऱ्या बेळगावचा विकास आहे कि भकास? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सुरु झालेल्या कामांमुळे जनतेच्या कौतुकापेक्षा तक्रारींचीच थाप अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. इतर सुविधा तर दूरच परंतु खड्डेमुक्त बेळगाव कधी होणार? आणि खड्ड्यांपासून मुक्ती मिळवून मोकळ्या श्वासाने रस्त्यावरून कधी प्रवास करणार हा प्रश्न जनता उपस्थित करत आहे. बेळगावमधील रस्त्यांचा विषय हा चर्चेचा तर आहेच परंतु आता तो चिंतेकडे वाटचाल करत आहे. रस्त्यांचे सदोष बांधकाम, डागडुजीदरम्यान करण्यात आलेला निष्काळजीपणा या गोष्टीवरून आता नागरिक टीकेची झोड उठवत आहेत.
बेळगावात अपघातांची संख्या वाढत जात असल्याने प्रशासनाने शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे असून त्याचबरोबर शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर वाहनबंदी घातली पाहिजे, अशी चर्चाही सुजाण नागरिक करत आहेत. बेळगावातील प्रमुख मार्ग असणाऱ्या मार्गावर गतिरोधक बसविणे गरजेचे असून ते गतिरोधक चन्नम्मा सर्कल पासून संभाजी चौक, नाथ पै सर्कल पासून व वडगाव क्रॉस, कोरे गल्ली कॉर्नर ते जैन कॉलेज, अंबाभूवन जवळील पोस्टमन चौक ते कॅन्टोन्मेंट बोर्ड, अंबाभवन ते इस्लामिया स्कूल, अंबाभुवन सर्कल ते ताशिलदार गल्ली, शनी मंदिर ते देशपांडे पेट्रोल पंप, आरपीडी सिग्नल ते गोवावेस स्विमिंग पूल, नवीन महात्मा फुले रोड, जे एन एम सी रोड अशा महत्वाच्या ठिकाणी गतिरोधकांची नितांत गरज आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
पावसाळा आला कि दरवर्षी बहुतेक सर्व रस्त्यांवर खड्ड्यांना आमंत्रण मिळते. आणि विकासकामांसाठी वापरण्यात आलेल्या निधीचा पर्दाफाशही या रस्त्यांमुळेच होतो! रस्त्यांचा वापर करणाऱ्या प्रत्येकासाठीच खड्डे हे मोठे विघ्न ठरतात. अशातच या रस्त्यांवरून होणारी अवजड वाहतूक! अवजड वाहनांमुळे या संकटात अधिकच भर पडते याचे ताजे उदाहरण म्हणजे बेळगावमध्ये आठवड्याभरात झालेले दोन अपघात! या अपघातांना नेमके जबाबदार कोण? प्रशासन कि कंत्राटदार? बेळगावमध्ये रहदारीची शिस्त महत्वाची आहेच परंतु या रस्त्यांसंदर्भातदेखील प्रशासन आणि कंत्राटदारांना शिस्तीचे पालन करणे अनिवार्य आहे.
बेळगावमध्ये होत असलेले असे असंख्य अनुचित प्रकार लक्षात घेता प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. वेळोवेळी करसंकलन, दंड आकारणी, वाहतुकीचे नियम आणि शिस्त यासंदर्भात जितकी तत्परता प्रशासन दाखवते तितकीच तत्परता प्रशासनाने मूलभूत नागरी सुविधांवर दाखवावी, अन्यथा नागरिकांच्या टीकेची झोड अधिकाधिक वाढत जाऊन जनता कधी रस्त्यावर उतरून यासाठी जबाबदार असणाऱ्यांना खड्ड्यात घालेल याचा नेम नाही! यामुळे आता प्रशासनाने तत्परता दाखवून हि समस्या तातडीने आणि गांभीर्याने सोडविणे महत्वाचे आहे.