बेळगावमधील रस्त्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे कि या रस्त्यांवरून नागरिकांना वर्दळ करणे म्हणजे आपल्या जीवाशी खेळ करण्याप्रमाणे वाटू लागले आहे. गेल्या चार दिवसात बेळगावमध्ये झालेल्या अपघाताची धास्ती घेऊन मनपा प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी बीएसएन रेजिमेंटच्या युवकाने चक्क स्वतःलाच श्रद्धांजली दिली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकासकामात आजतागायत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. शहरातील जवळजवळ प्रत्येक रस्ते खड्डेमय झाले आहेत. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याचाच परिणाम गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या दोन अपघातांमधून दिसून आला आहे.
कदाचित आपणदेखील या रस्त्यावरून जाताना आपला मृत्यू ओढवेल हि बाब अंतर्मुख होऊन विचार करून वरून खानोलकर या युवकाने स्वतःचाच फोटो रस्त्यावरील खड्ड्याशेजारी ठेवून जिवंतपणीच श्रद्धांजली दिली आहे.
रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे आपली अवस्थाही याहून वेगळी होणार नाही असे म्हणत या युवकाने हि शक्कल लढविली आहे. बेळगावमधील रस्त्यांमध्ये पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे प्रत्येकाला आपला जीव मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागत आहे.
अशावेळी प्रशासनाला जाग यावी यासाठी उपहासात्मक उपक्रम राबवून या युवकाने हि कल्पना लढविली आहे. यासंदर्भातील पोस्ट अनेक प्रसारमाध्यमांवर झळकली असून आता तरी प्रशासन जागे होऊन जनतेच्या जीवाशी खेळ करणे थांबवेल का? असा सवाल या युवकाने उपस्थित केला आहे.