बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (BCCI) च्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून केएलएस संस्थेच्या गोगटे महाविद्यालयाच्या के के वेणुगोपाल सभागृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित सदस्यांना अधिकारपदाची सूत्रे सोपविण्यात आली.
या कार्यक्रमास स्टार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन संजय घोडावत यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळते अध्यक्ष रोहन जुवळी यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले तर सचिन सबनीस यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रभाकर नागरमुनोळी यांनी अहवाल वाचन केले.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदी हेमेंद्र पोरवाल यांची निवड करण्यात आली असून विजय दरगशेट्टी यांनी त्यांचा परिचय करून दिला. यावेळी हेमेंद्र पोरवाल यांनी २०२२-२३ या सालातील उद्दिष्टे सांगितली.
व्यापार आणि उद्योग क्षेत्रात प्रगती करण्यासाठी मेगा ट्रेड फेअरचे आयोजन, तालुकानिहाय बैठका घेणे, जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजसोबत बैठकांचे आयोजन करणे, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नव्या इमारतीचे बांधकाम करणे आदी उद्दिष्ट्ये असल्याचे हेमेंद्र पोरवाल यांनी सांगितले.
संजय घोडावत आणि रोहन जुवळी यांच्याहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना पदभार सोपविण्यात आला. २०२२-२३ सालसाठी हेमेंद्र पोरवाल यांची अध्यक्षपदी, प्रभाकर नागरमुनोळी उपाध्यक्षपदी (वरिष्ठ), संजीव कट्टिशेट्टी उपाध्यक्षपदी (द्वितीय), स्वप्नील शाह सचिवपदी, आनंद देसाई सहसचिवपदी तर राजेंद्र मुतगेकर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.