भारतीय आदरातिथ्य उद्योग क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या बेळगावच्या इकोबील्झ या स्टार्टअपने कर्नाटक सरकार आयोजित एलिवेट -2021 ही स्टार्टअप स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे इकोबील्झ ही आता कर्नाटकातील आघाडीच्या स्टार्टप्स पैकी एक मानली जात आहे.
इकोबील्झ हे अल-लीड डिजिटायझेशन व्यासपीठ असून जे सर्वसमावेशक ऑटोमेशन मॉड्यूल्स उपलब्ध करते. या मॉड्युल्समध्ये डिजिटल चेक -इन, डिजिटल चेक -आउट, कॉन्टॅक्टलेस ऑपरेशन्स, खात्यात येणे बाकी, क्रेडिट कार्ड समेट, आयकर जमाखर्च आदींचा समावेश आहे.
हे स्मार्ट तंत्रज्ञान म्हणजे संपूर्णपणे स्वयंचलित प्रणाली असल्यामुळे हजारो लोकांचे काम आणि वेळ वाचणार आहे. या खेरीज डिजिटलायझेशनमुळे याचा फायदा पर्यावरणालाही होणार आहे. त्याचप्रमाणे कागदाची बचत होण्याद्वारे लाखो झाडे वाचणार असून कागद उत्पादनासाठी लागणाऱ्या तेल आणि पाणी या नैसर्गिक स्तोत्रांची देखील बचत होणार आहे.
सध्याच्या घडीला उद्योजक डॉ. अमित पाटील आणि नितेश सिंग राठोड यांच्या इकोबिल्झ या स्टार्टअपची उत्पादने देशभरातील 150 हून अधिक प्रीमियम हॉटेल्समध्ये वापरली जात आहेत.
बेळगाव येथे मुख्यालय असलेल्या इकोबिल्झचा विस्तार देशाबाहेर आफ्रिका, मध्य -पूर्व, युरोप आणि आग्नेय आशियामध्ये वाढविण्याचा विचार केला जात आहे.