पत्रकार, महिला आणि नागरिकांची फेक अकाउंटद्वारे बदनामी करणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीतून निश्चित कारवाई केली जाईल, असे ठोस आश्वासन बेळगाव सायबर पोलीस स्थानकाचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी दिले.
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक यांच्या नेतृत्वाखालील पत्रकार संघाच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांची भेट घेतली आणि मागील आठवड्यात दाखल केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा केला त्यावेळी गड्डेकर यांनी वरील आश्वासन दिले आहे.
बेळगावातील नामांकित वेब पोर्टल आणि पत्रकारांची कांही समाजकंटकाकडून फेसबुकवर फेक अकाउंट काढून बदनामी केली जात होती. त्या विरोधात जिल्हा मराठी पत्रकार संघाने मोहीम उघडून थेट पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या आणि सायबर पोलीसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करताच फेक अकाउंट डिलीट करण्यात आलेली आहेत.
फेक अकाउंट डिलीट झाले तरी बदनामी करणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. सोशल मीडियावर फेसबुकचे फेक अकाउंट काढून जे कोणी पोस्ट केलेल्या बातम्यांवर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करून एखाद्या व्यक्तीची संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर निश्चितच मी कायद्याच्या चौकटीतून कारवाई करेण, असे ठोस आश्वासन गड्डेकर यांनी दिले.
त्या फेक अकाउंट चालवणाऱ्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे संबंधित फेसबुक अकाउंट कोणाचे आहे ते आम्हाला निश्चितच समजेल आणि ते समजल्यानंतर आम्ही त्यांच्यावर नक्की कारवाई करू असेही बी. आर गड्डेकर यांनी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला ठामपणे सांगितले.
यावेळी जिल्हा पत्रकार संघटनेचे शेखर पाटील, विकास कलघटगी सुहास हुद्दार, डी. के. पाटील, प्रकाश बेळगोजी, संजय चौगुले आदी उपस्थित होते.मराठी पत्रकार संघाने दिलेल्या तक्रारीनुसार संकल्प पाटील,सोमनाथ श्री हरी आणि तुषार पाटील नामक फेसबुक अकाउंट वरून ज्यांनी कांही प्रतिकूल कॉमेंट्स केलेले आहेत त्या कोमेन्ट केलेल्या टोळक्यांचा सायबर सेलने तपास चालू केला आहे अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.