महानगरपालिकेची निवडणूक होऊन 11 महिने 13 दिवसाचा कालावधी उलटला आहे.मात्र अजूनही महापालिकेला महापौर उपमहापौर मिळालेला नाही. यामुळे महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीचे भिजते घोंगडे तसेच पडून आहे. सदर निवडणूक होऊन वर्ष होण्यास केवळ काही दिवस बाकी असताना देखील अजूनही सदर निवडीचे कोणतेच संकेत दिसून येत नाहीत.
मनपाची निवडणूक गेल्यावर्षी 6 सप्टेंबर 2021 झाली होती सदर निवडणूक होऊन साधारण 347 दिवस पूर्ण झाले आहेत. 6 सप्टेंबरला निवडणूक झाल्यानंतर सदर निवडणुकीचा निकाल १० सप्टेंबर2021 रोजी जाहीर करण्यात आला होता. सदर निवडणुकीत भाजपाने आघाडी घेतली होती एकूण 58 जागांपैकी 35 जागांमध्ये भाजपने निर्विवादपणे आपले वर्चस्व मिळवले होते.मात्र अजूनही सदर निवडणुकीनंतर महानगरपालिकेचे महापौर व उपमहापौर निवडण्यात आलेले नाही.
शिवाय निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा अजून शपथविधी देखील पार पडलेला नाही यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.बेळगावच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी 15 ऑगस्ट पूर्वी महापौर आणि उपमहापौर यांची निवड होईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे सांगितले होते. मात्र 15 ऑगस्ट होऊन चार दिवस झाले तरी अजूनही महापौर उपमहापौर निवडीचे कोणतेच संकेत दिसून आलेले नाहीत. परिणामी अजूनही महानगरपालिका महापौर उपमहापौर विनाच असल्याचे दिसून येत आहे.
सदर निवड आरक्षणाच्या मुद्द्यावरून लांबली असल्याचे बोलले जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून लांबलेली महापौर उपमहापौरची निवड आणि यामुळे महानगरपालिकेच्या कार्यभारावर होणारा परिणाम याचा विचार करून लवकरात लवकर सदर निवड व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
यामुळे परिणामी सदर लांबलेल्या निवडीमुळे महानगरपालिकेचा कार्यभार आणि यामुळे मनपावर होणारा परिणाम याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.