विधानसभा निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया आज सोमवारपासून सुरू झाली असून ती येत्या 31 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उपरोक्त माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीला 6 ते 8 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे विविध पातळीवर तयारी सुरू केली जात आहे. याचाच पहिला टप्पा म्हणून मतदार याद्यांना आधार कार्ड लिंक देण्याची योजना आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे याबाबत स्पष्ट सूचना बजावण्यात आल्या असून त्याची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून ही केली जाणार आहे.
प्रस्तुत मतदार ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे विहित नमुना अर्ज क्रमांक 6 -बी भरून देता येईल अथवा ऑनलाइन एनव्हीएसपी, व्हीएचए ॲप माध्यमातून आधार कार्ड लिंक करून घेता येईल.
ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांच्यासाठी 11 पर्याय दाखले सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यात रोजगार हमी योजना ओळखपत्र, पोस्ट खाते अथवा बँकेचे पासबुक, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आदींचा समावेश आहे.
दरम्यान, मतदार यादीत नांव नोंदणीसाठी अर्ज उपलब्ध होणार असून प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. मतदार ओळखपत्र दुरुस्तीसाठी विहित अर्ज क्रमांक 8, मतदारसंघ बदलासाठी विहित अर्ज क्रमांक 6 आहे. त्यामध्ये आता आधार कार्ड लिंकचा समावेश करत विहित अर्ज क्रमांक 6 -बी याचा उल्लेख आहे.