धारवाड येथील एसडीएम हॉस्पिटलमधून ग्रीन कॉरिडोरद्वारे बेळगावच्या केएलई इस्पितळात जिवंत हृदय आणल्यानंतर आता प्रत्यारोपणासाठी झिरो ट्रॅफिकच्या माध्यमातून धारवाड येथून एक मूत्रपिंड (किडनी) आज सुखरूपपणे बेळगावला आणण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील हे स्वतः जातीने मूत्रपिंड धारवाडहून बेळगावला आणण्यासाठीच्या झिरो ट्रॅफिक व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.धारवाड येथील एसडीएम हॉस्पिटलमधून आज गुरुवारी सकाळी सुरक्षित पेटीतून रुग्णवाहिकेद्वारे प्रत्यारोपणासाठीचे मूत्रपिंड डॉ. प्रभाकर कोरे केएलई हॉस्पिटलमध्ये आणले गेले.
झिरो ट्रॅफिक व्यवस्थितद्वारे सायरन वाजवत मुत्रपिंड घेऊन येणारी रुग्णवाहिका आणि सोबतची पोलिसांची वाहने बेळगाव -धारवाड रस्त्यावरील साऱ्यांचीच लक्ष वेधून घेत होती.
अधिक माहितीनुसार, धारवाड कृषी विद्यापीठात नजीक रस्ते अपघातात एक महिला गंभीर जखमी झाल्यामुळे तिच्यावर एसडीएम हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येथे उपचार सुरू होते. तपासणी आणि उपचारांती डॉक्टरांनी त्या महिलेचा मेंदू मृत झाल्याचे (ब्रॅन डेड) जाहीर केले.
त्यानंतर मयत महिलेच्या कुटुंबीयांनी तिचे अवयव दान करून तिघांचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. या पद्धतीने मयत 48 वर्षीय कमलव्वा कलगेरी ही इट्टीनगुड्डा गावची महिला मृत्यूनंतरही आपले अवयव दान करून तिघांचे प्राण वाचविण्याद्वारे समाजासाठी प्रेरणा ठरली आहे.
कमलव्वाचे एक मूत्रपिंड झिरो ट्रॅफिकच्या माध्यमातून केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलला धाडण्यात आले असून ज्याचे मूत्रपिंड निकामी झालेल्या व्याधीग्रस्त रुग्णांमध्ये प्रत्यारोपण केले जाणार आहे. गेल्या सोमवारी याच पद्धतीने एक हृदय धारवाडहून बेळगावला आणण्यात आले होते.