गेल्या आठवड्याभरापासून चंदगड तालुक्यातील तिलारी आणि राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या धुवांधार पावसामुळे राकसकोप जलाशय तुडुंब भरले असून अवघ्या आठवड्याभरात जलाशयातील पाण्याची पातळी तब्बल 15 फुटाने वाढली आहे. परिणामी ते ओव्हर फ्लो होण्यासाठी अवघे 5 फुट बाकी आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या तीन-चार दिवसात हे जलाशय ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात गेल्या आठ -दहा दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. आता गेल्या दोन-तीन दिवसापासून दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. राकसकोप जलाशयाची पाणीसाठा क्षमता केवळ ‘अर्धा टीएमसी’ इतकी असून काल बुधवार जलाशयाची पाणी पातळी 2467.80 फूट इतकी नोंद झाली होती.
काल रात्रभर पडलेल्या पावसामुळे पाणी साठ्यात आणखी वाढ झाली असून जलाशय ओव्हर फ्लो होण्यास 5 मीटर बाकी आहेत. मागील वेळी 30 जुलै 2019 रोजी राकसकोप जलाशय पहिल्यांदा ओव्हर फ्लो झाले होते. त्यानंतर 2020 -21 मध्ये 6 ऑगस्ट रोजी धोक्याची पातळी ओलांडून ते ओव्हर फ्लो झाले होते. सध्या जलाशयातील इनफ्लो वाढला असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या तीन-चार दिवसात राकसकोप ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.
राकसकोप जलाशयाचे पाणलोट क्षेत्र चंदगड तालुक्यात येते त्यामुळे तेथे पाऊस वाढला की राकसकोपची पातळी झपाट्याने वाढते. गेल्या आठवड्याभरात चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे राकसकोपची पातळी झपाट्याने वाढली आहे. या जलाशयाला मिळणाऱ्या जांभूळ कोहळ नाल्यासह सर्वच नाले सध्या तुडुंबू भरून वाहत आहेत.
त्याचप्रमाणे मार्कंडेय नदीपात्रातील पाण्याची पातळी देखील झपाट्याने वाढली असून नदी दुधडी भरून वाहत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्कंडेय नदीकाठच्या शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाची संततधार दिवसागणिक वाढत चालली असून ती आणखी वाढल्यास मार्कंडेय नदीपात्रा बाहेर पाणी येण्याची शक्यता आहे. दरवर्षी नदीला पूर येऊन 10 ते 15 दिवस नदीकाठावरील शेती पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागते. सध्याचा पावसाचा जोर पाहता यंदाही ती परिस्थिती उद्भवणार की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.