वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रा उद्या मंगळवार दि. 26 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. उद्या यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचण होऊ नये यासाठी मंदिर परिसरात विविध उपाययोजनांद्वारे जय्यत तयारी करण्यात आली आहे.
श्री मंगाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गेल्या कांही दिवसांपासून यात्रा कमिटीतर्फे विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. मंदिर तसेच परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यासह विविध प्रकारची सजावट केली जात आहे.
उद्या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने आज पूर्वतयारीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या प्रकारे दर्शन घेता यावे यासाठी दोन रांगा असणार आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष भाविकांना देवीचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे ही यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती. तसेच या कालावधीत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे दोन वर्षातील कसर भरून काढताना यावेळी भाविक श्री मंगाई देवी यात्रा मोठ्या प्रमाणात अपूर्व उत्साहाने साजरी करताना दिसणार आहेत. यात्रेसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य आणि कोंबडे खरेदी करण्यासाठी काल रविवारी खासबागच्या बाजारात मोठी गर्दी झाली होती.
यात्रेनिमित्त श्री मंगाई देवी मंदिर परिसरातील रस्त्यांवर मनोरंजनाच्या साहित्य इतर प्रकारचे साहित्य विक्रेत्यांनी दुतर्फा आपली दुकाने थाटली आहेत. यात्रेसाठी वडगावात आत्तापासूनच भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. यात्रेचा उद्या मंगळवार मुख्य दिवस असला तरी पुढील आठवडाभर वडगावचा परिसर यात्रेमुळे गजबजून जाणार आहे.
त्यामुळे या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान नागरिक -भाविकांनी सहकार्याची भूमिका ठेवून यात्रा शांततेत पार पाडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन श्री मंगाई देवी यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे.