प्रशासकीय तसेच अन्य कारणास्तव तेलुगु आणि मराठी विषयाची आजची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा अर्थात यूजीसी नेट -2022 परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या विषयांच्या परीक्षेची नवी तारीख लवकरच यूजीसी नेट वेबसाईटवर जाहीर केली जाणार आहे. तरी संबंधित उमेदवारांनी गोंधळून न जाता याची नोंद घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी केले आहे.
प्राध्यापक वगैरे पदांच्या भरतीसाठी यूजीसी नेट परीक्षा घेतली जाते. दरवेळी या परीक्षेचे ऍडमिट कार्ड परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना 8 -15 दिवस आधी दिले जाते. मात्र यावेळी आज 9 जुलैपासून सुरू होणाऱ्या या परीक्षेचे ऍडमिट कार्ड तीन-चार दिवसांपूर्वी देण्यात आले आहे.
तथापि मराठी व तेलगू उमेदवारांना मात्र ऍडमिट कार्ड देण्यातच आलेले नव्हते. त्यामुळे सायबर कॅफेमधून सदर कार्ड डाऊनलोड करून घेण्यासाठी संबंधित परीक्षार्थींची धडपड सुरू होती. तथापि कालच परीक्षा मंडळाकडून तेलुगु आणि मराठी विषयाची नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे ई-मेल द्वारे कळविण्यात आले आहे.
मराठी मुले ई-मेल तपासण्याच्या बाबतीत माहितगार नसतात त्यामुळेच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे न समजल्याने ऍडमिट कार्डसाठी त्यांचा आटापिटा सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच कॉल सेंटरकडून फोन उचलला जात नसल्यामुळे त्यांच्या गोंधळात अधिकच भर पडली होती.
तरी सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे नोंद संबंधित उमेदवारांनी घ्यावी. त्याचप्रमाणे परीक्षेची नवी तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने संबंधितांनी यूजीसीची वेबसाईट आणि ई-मेल सातत्याने तपासत राहावे. तसेच शंका निरसनासह अधिक माहितीसाठी आपल्याशी (+91 98444 97079) संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी केले आहे.