Saturday, December 21, 2024

/

कमानीला हात लावाल तर खबरदार -उचगाव ग्रामस्थांचा इशारा

 belgaum

उचगाव फाट्यावर उभारलेल्या स्वागत कमानीला हात लावाल तर खबरदार त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील, असा खणखणीत इशारा संतप्त उचगाव ग्रामस्थांनी दिला आहे.

उचगाव फाट्यावरील स्वागत कमानीवर असलेल्या मराठी व कन्नड मजकुरासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारी अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि समस्त उचगाव ग्रामस्थांची बैठक आज गुरुवारी सकाळी पार पडली. सदर बैठकीत ग्रामस्थांनी उपरोक्त इशारा दिला आहे. गावातील मध्यवर्तीय गणेश मंदिरामध्ये सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामस्थांच्या या बैठकीस जि. पं. अधिकारी बसवराज, ता. पं. सीईओ राजेश धनवाडकर, सीपीआय गुरुनाथ व पीडीआय वासुदत्त अधिकारी उपस्थित होते. वरून आदेश आला असल्यामुळे कोणालाही त्रास न देता स्वागत कमानी वरील मराठी मजकूर हटवला जावा, अशी विनंती यावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना केली.

यामुळे बैठकीतील वातावरण तापून ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची विनंती फेटाळून लावत कोणत्याही परिस्थितीत स्वागत कमानीवरील मजकुरात बदल केला जाणार नाही, तो हटवला जाणार नाही असे ठामपणे सांगितले. यावेळी बोलताना गावातील नेते बाळासाहेब देसाई म्हणाले की, सरकार व प्रशासन नामफलकाच्या बाबतीत 60 टक्के कन्नड मजकूर आणि 40 टक्के अन्य भाषेतील मजकूर असा नियम सांगते, तर मग त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयापासून समस्त सरकारी कार्यालयांच्या बाबतीत का घडत नाही? त्या ठिकाणी कन्नड बरोबरच मराठी भाषेतील मजकूर का लिहिला जात नाही? फक्त मतदार याद्या मराठीतून का दिल्या जातात का तर तुम्हाला मराठी माणसांची मते हवी असतात. तेंव्हा सर्वप्रथम सरकारी कार्यालयांवरील फलक कन्नड बरोबरच मराठी भाषेतून लिहिले जावेत, मगच आम्ही आमच्या स्वागत कमानी वरील सध्याचा मजकूर हटवू असे स्पष्ट केले.

बैठकीला उपस्थित ग्रामस्थांनी देखील सरकारी कार्यालयावरील फलकांमध्ये जोपर्यंत मराठी भाषेची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उचगाव स्वागत कमानी वरील फलक बदलण्यात येणार नाही असे ठामपणे सांगितले. प्रशासनाने वाटल्यास आमच्या स्वागत कमानीवर आणखी एक कमान उभारून त्यावर कन्नड मजकूर लिहावा असेही त्यांनी नमूद केले.Uchgaon

आपला निर्णय ठामपणे सांगणाऱ्या ग्रामस्थांनी पोलीस बळाचा वापर करून जबरदस्तीने जर उचगाव स्वागत कमानीवरील मराठी मजकूर हटविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. कोणी कमानीला हात लावण्याचे धारिष्ट केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा जो कांही प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी प्रशासन अर्थात सरकार जबाबदार राहील, असा इशाराही संतप्त ग्रामस्थांनी यावेळी दिला.

बैठकीत ग्रामस्थांनी आपला निर्णय दिल्यानंतर ग्रामपंचायतीने देखील त्या निर्णयाला पाठिंबा देऊन आपण ग्रामस्थांच्या बाजूने असल्याचे जाहीर केले. तसेच स्वागत कमानीवरील मराठी मजकूर हटविण्याचा आदेश प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी बैठकीत करण्यात आली.

Uchgaon board
Uchgaon marathi wel come board

बैठकीत झालेल्या चर्चेवेळी लोकप्रतिनिधी आमदारांचा विषय देखील पुढे आला. तेंव्हा बेळगाव ग्रामीणचे आमदारांनी स्वागत कमानीच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आमदारांची भूमिका ग्रामस्थांना पूरक असेल तर ठीक, अन्यथा भविष्यात मतयाचिनेसाठी त्यांनी उचगावकडे फिरकू नये, असा सल्लाही यावेळी देण्यात आला. उचगाव ग्रामस्थांनी दिलेल्या निर्णयाची नोंद उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतली. तसेच सदर बैठकीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल आणि त्यानंतर कोणती कार्यवाही करायची हे निश्चित केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीस ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांसह उचगाव ग्रामस्थ व गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.