बेळगाव शहरातील टिळक चौक येथील लोकमान्य टिळक चौक ऑटोरिक्षा संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
सदर जयंती कार्यक्रमास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी लोकमान्य टिळक चौक ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजू मोरे यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी सर्वांनी टिळकांना अभिवादन केल्यानंतर प्रमुख पाहुणे नंदीहळ्ळी यांनी आपल्या समायोचित भाषणात लोकमान्य टिळकांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली.
तसेच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल माहिती देताना आपली मातृभाषा मराठीचे जतन आणि संवर्धनासाठी प्रत्येक पालकांनी जागरूक राहिले पाहिजे, असे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक या नात्याने परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा पुष्पहार घालण्यास शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ऑटोरिक्षा संघटनेचे राजू तुडयेकर, विनायक जाधव, संजय देसाई, शिवा चौगुले, महांतेश हावळाप्पगोळ, प्रसाद कुडतरकर आदी बहुसंख्य रिक्षाचालक उपस्थित होते.