बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून उद्या रविवार दि. 10 जुलै रोजी बेळगाव शहर व तालुक्यातील सर्व मद्य विक्री दुकाने बंद राहतील, असा आदेश पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी जारी केला आहे.
सदर आदेशानुसार आज शनिवारी 9 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून सोमवार दि. 11 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत मद्य विक्रीची दुकाने, वाईन शॉप, बार आणि क्लब बंद राहतील.
हॉटेल -रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना मद्यप्राशन करण्यास देणे आणि मद्याच्या विक्रीवर पूर्णपणे निर्बंध असतील. त्यामुळे सर्व परवानाधारक मद्य विक्रीधारकांनी उद्या रविवारी आपली दुकाने बंद ठेवावीत. या आदेशाची अबकारी अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करावी.
हे करताना आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे देखील पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आपल्या आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.