टिळकवाडी येथील आरपीडी कॉर्नर अर्थात आरपीडी चौकाच्या नामांतराला साउथ कोकण एज्युकेशन सोसायटी (एसकेई) या शहरातील प्रख्यात शिक्षण संस्थेने तीव्र आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासकांना पत्र लिहून या चौकाच्या नामांतराचा प्रस्ताव रद्द करण्याची विनंती केली आहे. तसेच या चौकाचे नामांतर म्हणजे राजमाता राणी पार्वती देवी यांचा अपमान असल्याचे स्पष्ट केले आहे.
बेळगाव महापालिकेने आरपीडी चौकाचे ‘वीर मदकरी नायक सर्कल’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव मांडून त्यावर हरकती मागविले आहेत. सदर हरकतींची पडताळणी करून त्या सरकारकडे धाडल्या जातील असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले आहे. सदर सर्कल हे राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हरकतींची पडताळणी केली जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांनी दिली. आरपीडी चौकाच्या नामांतरास मराठी भाषिकांनी आक्षेप घेतला आहे. साउथ कोकण एज्युकेशन सोसायटीने (एसकेई) देखील त्यावर आक्षेप नोंदविला आहे.
राणी पार्वती देवी या मुंबई प्रांत अंतर्गत असलेल्या सावंतवाडीच्या राजमाता (राणी) होत्या. सावंतवाडी संस्थानाचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण झाल्यानंतर तो महाराष्ट्र राज्याचा भाग ठरला. तरीही बेळगाव नजीकच्या हिंडलगा येथील उन्हाळी महलमध्ये राजमातांचे वास्तव्य होते. परोपकारी, गरीब आणि वृद्ध ज्येष्ठ मंडळींना मदत करणाऱ्या राजमातांचे आरोग्य शिक्षण आणि महिला विकास यामध्ये मोठे योगदान आहे.
त्यामुळे त्या बेळगावमध्ये घरोघरी परिचित आहेत. शिवाय साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीचे हे राणी पार्वती देवी महाविद्यालय ‘आरपीडी’ म्हणून प्रसिद्ध आहे. आरपीडी महाविद्यालय सावंतवाडी मध्ये 1945 मध्ये सुरू झाले. पुढे 1947 -48 मध्ये मलेरियाच्या साथीमुळे हे महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेंव्हा बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसैनिक बाबुराव ठाकूर, डॉ. जी. व्ही. हेरेकर, अण्णासाहेब लठ्ठे, गंगाधरराव देशपांडे, व्ही. व्ही. हेरवाडकर, डॉ. वाय. के. प्रभू आदींनी राजमातांकडे ते महाविद्यालय बेळगावात स्थलांतरित करण्याची विनंती केली. ती विनंती राजमाता यांनी मान्य केल्यामुळे ते महाविद्यालय 1 जानेवारी 1948 रोजी बेळगावच्या साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या (एसकेई) आवारात स्थलांतरित करण्यात आले.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनायक गोविंद करंदीकर (विदा करंदीकर), पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार विजेते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु ल देशपांडे), भारतीय संस्कृती संशोधक कलाप्पा गिरियाप्पा कुंदानगर आदी अनेक ख्यातनाम व्यक्तींनी बेळगावच्या आरपीडी महाविद्यालयामध्ये सेवा बजावली आहे. असंख्य राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार, वैज्ञानिक, लेखक, नाटककार, कलाकार आणि क्रीडापटू हे राजमाता श्रीमती राणी पार्वती देवी यांनी सुरू केलेल्या या आरपीडी महाविद्यालयाचे अभिमानी माजी विद्यार्थी आहेत. आजच्या घडीला ‘आरपीडी’ ही घराघरात माहित असलेली बेळगाव शहराची महत्त्वाची खूण आहे.
चित्रदुर्गचे वीर मदकरी नायक हे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असले तरी बेळगाव आणि आसपासच्या बहुसंख्य नागरिकांना ते परिचित नाहीत. व्यावसायिक व कार्यालयीन पत्ता खानापूर रोड, आरपीडी चौक म्हणून दिला जातो. त्यामुळे या चौकाचे नांव बदलण्यास साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापनाने आक्षेप घेतला आहे. तसेच शहरातील महत्त्वाच्या सुंदर उद्यानाला वीर मदकरी नायक यांचे नांव द्यावे अशी विनंती केली आहे.