बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आज बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांचा 62 वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आज बुधवारी सकाळी शहरातील टिळक चौक येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बेळगाव जिल्हा शिवसेना वैद्यकीय विभाग प्रमुख दत्ता जाधव आणि उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते केक कापून माननीय उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनाप्रमुख दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे, मा. उद्धवजी ठाकरे व आदित्यजी ठाकरे यांचा जयजयकार करण्यात आला.
त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, आदित्यजी ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है आदी घोषणा देण्यात आल्या. वाढदिवसाचा आनंद व्यक्त करताना यावेळी शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करण्याबरोबरच टिळक चौक परिसरात मिठाईचे वाटप केले.
याप्रसंगी बोलताना दत्ता जाधव यांनी तमाम सीमावासीय आणि शिवसेनेतर्फे आज शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करत आहोत असे सांगितले. खरे तर आम्ही सर्व शिवसैनिक शुभेच्छा देण्यासाठी मुंबईलाच जाणार होतो, मात्र सध्याची तेथील राजकीय परिस्थिती आणि मातोश्रीवर शुभेच्छा देण्यासाठी जनसागर लोटणार असल्यामुळे आम्ही उद्धवजींना येथूनच शुभेच्छा देत आहोत असेही जाधव म्हणाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या गद्दारांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्या गद्दारांना धडा शिकवलाच पाहिजे असे सांगताना सीमा भागातील तमाम शिवसैनिकांचा उद्धवजींना पाठिंबा असून ते त्यांच्या पाठीशी आहेत, असे स्पष्ट केले.
बंडू केरवाडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वाढदिवसाबद्दल माहिती देऊन बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे बेळगावसह सीमाभागात शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी दर आठवड्याला विविध उपक्रम राबविले जातील अशी माहिती त्यांनी दिली.
वाढदिवस कार्यक्रमास शिवसेनेचे बेळगाव शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, संघटक तानाजी पावशे, रवींद्र जाधव, विजय मुरकुटे, बाळासाहेब डंगरले, प्रदीप सुतार, भाऊसाहेब किल्लेकर, आतिश जुटेकर, दिलीप नाईक, ज्ञानेश्वर मन्नुरकर, प्रकाश भोसले, विठ्ठल उंदरे, संजय चतुर, शेखर शेट्टी, संजय देसाई, विनायक केरवाडकर, भरमा सांवगावकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.