महाराष्ट्राने दावा केलेल्या सीमा भागातील 865 गावांमधील विद्यार्थ्यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमांसाठी मोफत तसेच माफक शुल्कात प्रवेश दिला जाणार असून त्याची बेळगाव शहर परिसरातील विद्यार्थी व पालकांना माहिती देणारा मार्गदर्शनपर कार्यक्रम आज पार पडला.
मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खानापूर रोडवरील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे आज मंगळवारी सकाळी या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या प्रा. भारती पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रा. नंदकुमार मोरे, प्रा. अविनाश पाटील, प्रवीण प्रभू, कऱ्हाडे आदी सात जणांचा समावेश असलेले पथक उपस्थित होते.
या पथकाने महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या सीमा भागातील 865 गावांमधील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध अनुदानित महाविद्यालयात मोफत प्रवेश व इतर महाविद्यालयात सवलतीच्या दरात प्रवेश मिळण्याच्या प्रक्रियेची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना प्रा. भारती पाटील म्हणाल्या की सीमाभागातील विद्यार्थ्यांना जे विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत ते शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पस मधील आहेत. महाविद्यालयांसाठी ही योजना नाही हे लक्षात घेतले जावे. मोफत व माफक शुल्काच्या आमच्या या योजनेमध्ये नॅनो सायन्स, बीई ग्रॅज्युएशन आणि बीएससी इकॉनॉमिक्स या तीन पदवी अभ्यासक्रमांचा समावेश असून उर्वरित सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये एमए, एमएससी, एमकॉम, एफजेसी, एम टेक यांचा समावेश आहे असे सांगून ज्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाले आहे त्यांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाईल, असे प्रा भारती पाटील यांनी स्पष्ट केले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या पथकातील सदस्यांसह समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर आणि सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आल्यानंतर माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक केले. सदर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचा बेळगाव शहर आणि परिसरातील विद्यार्थी -विद्यार्थिनी तसेच पालक वर्गाने मोठ्या संख्येने लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले.
सदर कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शिवाजी विद्यापीठ पथकाच्या प्रमुख प्रा. भारती पाटील यांनी अनुदानित अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार असून त्यांची वस्तीगृहाची सोय देखील मोफत केली जाणार आहे. फक्त त्यांना आपल्या जेवण वगैरेची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शुल्कामध्ये 25 टक्के सवलत दिली जाईल असे सांगितले. अभ्यासक्रमांसाठी 10 टक्क्याहून अधिक जागा सीमाभागातील मराठी मुलांसाठी राखीव ठेवल्या जातील. कोल्हापूरसह शिवाजी विद्यापीठाचे सीमाभागातील संबंधित 865 गावांशी एक वेगळे भावनिक नाते असल्यामुळे त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठ यंदा हिरक महोत्सव साजरे करत असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही सुरू आहे. याचे औचित्य साधून ही अभ्यासक्रमाची योजना सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे प्रा भारती पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे सीमाभागातील विद्यार्थी व पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बेळगावसह सीमाभागातील विध्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची योजना माहिती सांगताहेत प्रा.भारती पवार @belgaumlive @DrBharatippawar
@shivajiUniversityKol@samant_uday pic.twitter.com/P9mLyB6OnF— Belgaumlive (@belgaumlive) July 26, 2022