जांबोटी रोडवरील बामणवाडी -कुट्टलवाडी तेथील शांताई वृद्धाश्रमाच्या सदस्या कावेरी भीमराव कुलकर्णी (वय 85, रा. मूळच्या अथणी) यांचे आज मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष माजी महापौर व सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी मयत कावेरी यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांची त्वचा व मृतदेह दान केला आहे.
बैलहोंगल येथील डॉ रामन्नावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मयत दात्याची त्वचा बेळगावच्या केएलई रोटरी स्किन बँकेला भाजलेल्या व्यक्तींना वापरण्यासाठी दान करण्यात आली.
त्याचप्रमाणे मयत कावेरी यांचा मृतदेह केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या हुबळी जिल्हा धारवाड येथील जगद्गुरु गंगाधर महास्वामीगळू मुरसावीरमठ वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला.
रामन्नावर ट्रस्टचे डॉ. महांतेश रामन्नावर यांनी त्वचा आणि मृतदेह दान करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. केएलई हॉस्पिटल विकास आणि नूतन प्रकल्प संचालक डॉ. व्ही. डी. पाटील,
प्राचार्य डॉ. एम. जी. हिरेमठ, स्किन बँकेचे समन्वयक डॉ. राजेश पवार, डाॅ. महांतेश रामन्नावर, शांताई वृद्धाश्रम संचालक मंडळाचे सदस्य संतोष ममदापूर, वसंत बालिगा आणि युवा नेते ॲलन मोरे यांनी मयत कावेरी यांचे अवयव व मृतदेह दान केल्याबद्दल कुलकर्णी कुटुंबीयांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे.