दुधासह अन्नधान्य, डाळी आदी जीवनावश्यक साहित्यावर जीएसटी कर आकारणी करून केंद्रातील भाजप सरकार देशातील सर्वसामान्य गरीब जनतेच्या जीवावर उठले आहे, असा आरोप करत एसडीपीआय संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसडीपीआय संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या हातातील राज्य व केंद्र सरकारच्या अन्यायी नीतीच्या निषेधाचे फलक व पोस्टर्स साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
याप्रसंगी आंदोलनकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात होत्या. केंद्र सरकारच्या अन्यायी नीतीमुळे गरीब जनतेवर अन्नालाही महाग होण्याची वेळ आली आहे.
करांमुळे नुकतेच पेट्रोल, डिझेल, अन्नपदार्थ महागले असताना आता दूध, अन्नधान्य, डाळी या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी कर लादून सरकारने मध्यमवर्गीय आणि गरिबांचे जगणे अवघड केले आहे असा आरोप यावेळी एसडीपीआय नेत्यांनी केला. तसेच जीवनावश्यक वस्तूंवरील कर तात्काळ मागे घेतले जावेत, अशी मागणीही केली.
निदर्शने करण्यात आल्यानंतर एसडीपीआय संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आजच्या या आंदोलनात एसडीपीआय नेते वासिम अस्लम अब्दुल हमीद इमरान मुल्ला नवाज मुल्ला समीर पारिशवाड आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.