राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. राज्यात हत्त्येच्या घटनांचे गृहमंत्र्यांना गांभीर्य नाही. एकंदर राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात राज्य भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असा स्पष्ट आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला आहे.
गोकाक येथे आज शनिवारी पत्रकारांशी बोलताना आमदार जारकीहोळी यांनी उपरोक्त आरोप केला. राज्यातील भाजप सरकारवर टीका करताना हे सरकार आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. सरकार कशा पद्धतीने चालविले पाहिजे याचे भान भाजप नेत्यांना नाही. हत्त्यांच्या घटनांमध्ये हिंदू-मुस्लिम असा भेदभाव केला जात आहे.
हत्या झाल्याबद्दल मयत भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा करणाऱ्या भाजप सरकारने इतर धर्मियांना एक रुपयाही नुकसान भरपाई दिलेली नाही. थोडक्यात या सरकारकडून नुकसान भरपाई देताना देखील भेदभाव केला जातो, असे आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याऐवजी हे सरकार निवडणुकीसाठी हॉट बँक तयार करण्याच्या मागे लागले आहे असे सांगून सरकारने हिंदू मुस्लिम एससी-एसटी असा भेदभाव न करता सर्व जातीधर्मांना एका दृष्टिकोनातून पाहून समान न्याय दिला पाहिजे, असेही आमदार जारकीहोळी म्हणाले