सांबरा (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा ही संस्थानी काळात 1877 साली स्थापन झालेली बेळगाव तालुक्यातील पहिली मराठी शाळा असून आज ही शाळा तालुक्याच्या पूर्व भागात उत्तम शिक्षण देणारी सर्वात जुनी व मोठी शाळा म्हणून देखील सुपरिचित आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात सांबरा हे गाव सांगली संस्थानांमध्ये येत होते. तसेच त्यावेळी शहापूर तालुक्यामध्ये या गावाचा समावेश होता. त्या काळी सांगली संस्थानाच्या पटवर्धन राजानी शहराबरोबरच ग्रामीण भागातील अनेक गावात मराठी शाळा सुरू करण्यास प्राधान्य दिले होते.
त्यानुसार 26 डिसेंबर 1877 रोजी सांबरा येथे मराठी शाळेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी शिक्षणासाठी येऊ लागले. परिणामी कांही वर्षातच या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची नोंद शाळेच्या दप्तरात पहावयास मिळते. सुरुवातीला कौलारू इमारत असलेल्या या शाळेला 1973 साली सरकारी आदर्श मराठी शाळेचा दर्जा मिळाला. त्यानंतर 2007 मध्ये या शाळेची नोंद मॉडेल शाळा म्हणून झाली. तसेच या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सुत काढण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.
सदर शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अन्यक्षेत्रांसह क्रीडा क्षेत्रामध्ये देखील नावलौकिक मिळवला आहे. अलीकडच्या कांही वर्षात परिसरातील शाळांची संख्या वाढल्याने या शाळेतील पटसंख्या कमी झाली आहे. सांगली संस्थानातील उत्तम शाळा म्हणून या शाळेचा गौरव करण्यात आला होता. तालुक्याच्या पूर्व भागात या शाळेमध्ये सर्वप्रथम बँड पथक तयार करण्यात आले होते. शाळेच्या एका खोलीत मल्लखांब उभा केला होता. या शाळेतील लेझीम पथकाला तालुक्यातील आदर्श लेझीम पथक म्हणून गौरव करण्यात आले आहे. एकेकाळी कौलारू असलेल्या या शाळेच्या ठिकाणी सध्या भव्य शाळा इमारत उभी आहे.
सदर शाळेचे स्वतःचे अतिशय सुसज्ज असे ग्रंथालय असून आज देखील कांही दुर्मिळ पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. माजी विद्यार्थ्यांची या शाळेशी घट्ट नाळ जोडली गेली आहे. हे विद्यार्थी वेळोवेळी शाळेच्या विकासासाठी सहकार्य करत असतात. अलीकडेच 1996 -97 सालच्या इयत्ता सातवीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
तब्बल 25 वर्षानंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या स्नेहमेळाव्यानिमित्त संपूर्ण शाळा इमारतीला विद्युत रोषणाई करण्याबरोबरच शाळेच्या आवाराची स्वखर्चाने रंगरंगोटी तर केलीच, शिवाय शाळेतील मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एक्वागार्डची स्टील टाकीही देणगी दाखल दिली. त्याचप्रमाणे शाळेचे माजी जेष्ठ विद्यार्थी राजशेखर मल्लेशप्पा करडेगुद्दी यांनी शाळेच्या विकासासाठी 25 हजार रुपयांची देणगी दिली.
सध्या सांबरा सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकपदी अनिता पाटील या कार्यरत असून शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. शाळेच्या उत्कर्षाबद्दल बोलताना मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी शाळेमध्ये विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा मोठा हातभार लागला असल्याचे स्पष्ट केले. तसेच शाळा सुधारणा समितीकडून देखील विद्यार्थी पटसंख्या वाढावी आणि मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.