येळ्ळूर रोड येथील केएलई सेंटीनारी चॅरिटेबल हॉस्पिटलमधील रोटरी क्लब ऑफ बेळगाव पुरस्कृत नूतन डायलेसिस सेंटरचा उद्घाटन समारंभ काल गुरुवारी उत्साहात पार पडला.
सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ प्रभाकर कोरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून नव्या डायलेसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी सन्माननीय अतिथी पीडीजी रो. संग्राम पाटील डॉ एस सी धारवाड आणि डॉ एच. बी. राजशेखर यांच्यासह रोटरी प्रांतपाल पदासाठीचे उमेदवार रो. शरद पै, रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष बसवराज विभुती, सेक्रेटरी अक्षय कुलकर्णी आणि माजी अध्यक्ष डाॅ. केळुसकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सदर प्रकल्पाचे देणगीदार पराग भंडारी, अनिश मेत्रानी, बसवराज विभूती, संजय कुलकर्णी, डॉ भांडारकर आणि निरंजन संत यांचा प्रमुख पाहुणे प्रभाकर कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
देणगीदारांच्या सत्कारानंतर डायलेसिस केंद्राची जबाबदारी सांभाळून देखभाल करणारे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. विजयकुमार पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा देखील गौरव करण्यात आला. प्रभाकर कोरे यांनी आपल्या भाषणात नूतन डायलिसिस केंद्रासह रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या आरोग्याच्या काळजी संदर्भातील भावी प्रकल्पांना शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन समारंभाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे पदाधिकारी, सदस्य, केएलई व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद उडचणकर यांनी केले तर शेवटी अक्षय कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले. रोटरीच्या या केएलई डायलेसिस केंद्रामध्ये माफक दरात उपचार उपलब्ध असणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य गरजू रुग्णांची चांगली सोय होणार आहे.