बेळगाव तालुक्यातील नंदीहळ्ळी येथून गर्लगुंजी गावाकडे जाणाऱ्या सुमारे 2 कि. मी. अंतराच्या रस्त्याची वाताहत झाली असून तो तात्काळ दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव तालुक्यातील नंदीहळळी ते गर्लगुंजी हा सुमारे 3 कि. मी. अंतराचा रस्ता असून नंदीहळ्ळी गावापासून 2 कि. मी. अंतराच्या या रस्त्याची सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अधिकच दुर्दशा झाली आहे.
सदर जवळपास 10 वर्षांपूर्वी हा रस्ता डांबरीकरण करून व्यवस्थित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर या रस्त्याकडे संबंधित खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे. परिणामी अलीकडच्या काळात नंदीहळ्ळी गावानजीक सदर रस्त्याची खाचखळगे व मोठे खड्डे पडून वाताहत झाली आहे. गेल्या कांही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून तो वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
या पद्धतीने रस्ता धोकादायक बनल्याने या मार्गावरून वाहने चालविणे कठीण झाले आहे. सध्या वाहन चालकांना मोठी कसरत करत या रस्त्यावरून वाहने ये -जा करावी लागत आहे. परिणामी वाहन चालकांसह प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जर आणखी मोठा पाऊस झाल्यास या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे. नंदीहळ्ळी गावातील अनेक मुले शालेय शिक्षणासाठी खानापूरला जातात. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्यास या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
सदर रस्त्याची दुरुस्ती केली जावी यासाठी माजी ता. पं. सदस्य मारुती लोकूर, ॲड. मारुती कामाण्णाचे आदींनी वारंवार तक्रारी, अर्ज-विनंत्या करूनही अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. तरी बेळगाव ग्रामीणच्या आमदारांनी या रस्त्याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने हा रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहेत.