नागरिकांच्या समस्यांना तात्काळ प्रतिसाद देऊन कार्यवाही करा, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज विविध खात्यांच्या समन्वय बैठकीमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांना केली आहे.
विविध सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी बोलत होते. कॅन्टोन्मेंट परिसरासह शहराच्या कोणत्याही भागात पिण्याचा पाणी पुरवठा, खंडित वीजपुरवठा वगैरे कोणतीही समस्या असेल तर संबंधित खात्याने त्याची तात्काळ दखल घेतली पाहिजे, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीज स्थगिती, पार्किंग समस्या, विकास कामात विलंब वगैरे समस्यांना तोंड द्यावे लागते. या परिस्थितीत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकमेकाच्या समन्वयाने नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविल्या पाहिजेत. सध्या शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविली जात असली तरी तिची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तेंव्हा महापालिका, पाणी पुरवठा मंडळ, सीवरेज बोर्ड, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि एल अँड टी कंपनी यांनी एकमेकांशी समन्वय साधून काम केले पाहिजे.
खंडीत वीज पुरवठ्याच्या बाबतीत वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोसळलेली झाडे फांद्या तात्काळ हटविल्यानंतर हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी सुरळीत वीज पुरवठ्यासाठी त्वरेने कार्यवाही करावयास हवी, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
पार्किंग व्यवस्थापनाशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये समन्वय राखून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.