अनगोळ स्मशानभूमीच्या आवार भिंतीनजीक असलेल्या झाडामुळे भिंतीचे नुकसान होण्याबरोबरच तिला तडे पडून आवार भिंत दिवसेंदिवस धोकादायक बनू लागली आहे. यासाठी संबंधित झाड त्वरित हटवावे अशी मागणी केली जात आहे.
अनगोळ स्मशानभूमीत असलेल्या झाडांपैकी कांही झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने या झाडांचा बुंधा आणि मुळांमुळे आवार भिंतीला धोका निर्माण झाला आहे. स्मशानभूमीच्या आवार भिंतीला तडे जात असून एका कोपऱ्यात ही भिंत दुभंगू लागली आहे. या खेरीज पाऊस आणि वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या तुटून पडत असल्यामुळे संरक्षक भिंतीचे नुकसान होत आहे. गेल्या कांही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा जोर वाढल्याने स्मशानभूमीतील जुनी पूर्ण वाढ झालेली झाड धोकादायक बनत आहेत.
सदर झाडे हटविण्याबाबत सातत्याने मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या झाडांपैकी एका झाडामुळे तर आवार भिंत आणि इमारतीचेही नुकसान होत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास आवार भिंत कोसळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने हे झाड तोडून हटवावे, अशी मागणी वाढू लागली आहे.
शहराच्या अनेक भागात धोकादायक ठरत असलेल्या झाडे व फांद्या तोडण्याची मागणी सातत्याने करून देखील वनखाते नेहमीच त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
तेंव्हा एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनगोळ स्मशानभूमीतील धोकादायक झाडं आणि झाडांच्या फांद्या हटवाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.