आयएमटीएमए, बीएफसी आणि बीसीसीआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतीय रेड क्रॉस सोसायटीतर्फे औद्योगिक क्षेत्रासाठी फेसमास्क वितरण करण्याचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला.
उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहामध्ये काल शुक्रवारी सायंकाळी आयोजित या उपक्रमाप्रसंगी आयएमटीएमए बेंगलोरचे वरिष्ठ संचालक एम. कृष्णमूर्ती बीसीसीआय अध्यक्ष रोहन जुवळी, सीसीआय चेअरमन अनिश मेत्रानी, बेळगाव फाउंड्री क्लस्टरचे सेक्रेटरी सदानंद हुंबरवाडी, भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या कर्नाटक शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. एस. बी. कुलकर्णी आणि रेड क्रॉसच्या बेळगाव जिल्हा शाखेचे माजी सेक्रेटरी विकास कलघटगी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावरील औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांकडे फेसमास्क सुपूर्द करून औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोफत फेसमास्क वितरण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी रेड क्रॉसचे माजी राज्याध्यक्ष डॉ. एस. बी. कुलकर्णी यांनी प्रथमोपचारा संदर्भात माहिती दिली. हृदयविकार तसेच अन्य आणीबाणीच्या प्रसंगी प्रथमोपचार कसे करावे? याची माहिती देण्यासाठी लवकरच रेड क्रॉस सोसायटीकडून औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यशाळा देखील घेतली जाईल असे सांगितले.
त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांना मोफत फेसमास्क वितरणाची तयारी दर्शवली. यासाठी उद्योजकांनी आपापल्या फॅक्टरी -फर्ममधील लोकांची माहिती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या उद्यमबाग कार्यालयात नोंद करावी आणि आवश्यक मास्क घेऊन जावेत, असे आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास बेळगाव आतील उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.