बळ्ळारी नाला परिसरातील पूर परिस्थिती टाळण्यासाठी या नाल्यात प्रचंड प्रमाणात वाढलेल्या जलपर्णी आणि झाडाझुडपांचे उच्चाटन अत्यावश्यक असून ते युद्धपातळीवर केले जावे. त्याचप्रमाणे नागरिकांनी गटारी नाल्यांमध्ये कचरा टाकणे बंद केले पाहिजे, असे मत शेतकरी नेते नारायण सावंत यांनी व्यक्त केले.
दरवर्षी पावसाला सुरुवात होताच बळ्ळारी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येऊन परिसरातील हजारो एकर शेत जमीन पाण्याखाली जाते. सध्या पावसाचा जोर वाढला असून नाल्यातील पाणी आसपासच्या शेतात घुसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हने बळ्ळारी नाल्याचा थोडक्यात आढावा घेतला. याप्रसंगी नारायण सावंत बोलत होते. सावंत म्हणाले की, मोठ्या प्रमाणात वाढलेली जलत्परिणी झाडे झुडपे आणि केरकचरा यामुळे हा नाला तुंबत आहे. गेल्या 15 वर्षापासून ही बाब आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन बळ्ळारी नाला पूर परिस्थितीची समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करत आहोत.
मात्र दुर्दैवाने अद्याप देखील प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही आहे. पावसाळ्यात बळ्ळारी नाल्याला पूर येण्यास बऱ्याच प्रमाणात बेळगाव शहरवासीय देखील जबाबदार आहेत. नागरिकांनी घरातील केरकचरा गटारी आणि नाल्यामध्ये टाकण्याचे बंद करून तो कचरा व्यवस्थित कचरा गाडीकडे दिला पाहिजे. एवढे केले तरी पावसाळ्यात बळ्ळारी नाला तुंबण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात निकालात निघेल, असे मत सावंत यांनी व्यक्त केले.
कृषी मित्र सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी देखील बळ्ळारी नाला स्वच्छता आणि विकासासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही सर्वजण पाठपुरावा करत आहोत. परंतु आजतागायत नाला स्वच्छता आणि विकासाची कृती न करता फक्त आश्वासने दिली जात आहेत, असे खेदाने सांगितले. अन्य एका शेतकऱ्याने सध्याच्या पावसामुळे नाल्याकाठच्या शेतामध्ये आणि साचून भात वगैरे पिके कुजून गेले आहेत. पावसाळ्यात नाला तुंबण्याच्या समस्येमुळे दरवर्षी आमचे मोठे नुकसान होत आहे. तेंव्हा प्रशासनाने बळ्ळारी नाल्यामुळे निर्माण होणारी समस्या तात्काळ दूर करावी अशी मागणी केली.
एकंदर बळ्ळारी नाल्यातील प्रवाह पावसाळ्यात सुरक्षित होण्यासाठी सर्वप्रथम बेळगाव शहरातील नागरिकांनी गटारी आणि नाल्यामध्ये केरकचरा टाकणे बंद केले पाहिजे. यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने ‘गटार साक्षरता’ मोहीमेची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज बनली आहे. या खेरीज संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी नाल्यातील जलपर्णीसह झाडेझुडपे युद्धपातळीवर काढून नाला स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे. बसवन कुडची बळ्ळारी नाल्यातील जलपर्णी हटवली तर येळ्ळूर, हालगा परिसरातील शेतजमीन पाण्याखाली जाण्याचा धोका दूर होण्यास मदत होणार आहे. तेंव्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तात्काळ योग्य ती कार्यवाही करून दरवर्षी पुराचा फटका सहन करणाऱ्या बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.