बेळगाव जिल्ह्यात आता खऱ्या अर्थाने पावसाळ्याला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढू लागली आहे. परिणामी प्रशासनाकडून देखील सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत.
महाराष्ट्रातील कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कालच्या पावसामुळे नद्यांमधील पाण्याच्या पातळीत अधिकच वाढ झाली आहे. पंचगंगेसह इतर सर्व नद्या सध्या मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्या आहेत.
काल सोमवारपासून बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. सह्याद्री पर्वत प्रदेशातील खानापूरसह बेळगाव तालुक्यामध्ये कालपासून एकाच वेळी पावसाला सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थाने आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे यापुढे प्रशासन परिस्थिती कशी हाताळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागू राहिले आहे.
जिल्हास्तरावर हे चित्र असताना शहरांमध्ये देखील कालपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे अर्धवट अवस्थेतील विकास कामांच्या ठिकाणी दुरावस्था पहावयास मिळत आहे. अर्धवट अवस्थेतील विकास कामांची उडालेली दैना पाहता बेळगाव स्मार्ट सिटी आपल्या हयातीत तरी होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.
सध्या गॅस पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. उपनगरात त्यासाठी खुदाई केली जात आहे. परिणामी पावसामुळे या ठिकाणी सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित परिसरातील रस्ते चिखलाने माखून गेल्यामुळे स्थानिक रहिवाशांना रस्त्यावरून ये -जा करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.