कनक मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलशी संलग्न फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिलतर्फे नेहरूनगर येथील कनक इंग्रजी शाळेच्या मैदानावर आयोजित दहाव्या फिनिक्स चषक 13 वर्षाखालील मुलांच्या आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेला आज शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकीपटू डॉ. अश्विनी एस. शिंदे, माजी फिफा पंच गोव्याचे बेंजामिन सिल्वा आणि कनक मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य विद्या वग्गण्णावर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे सन्माननीय अतिथी म्हणून प्रशासक एस. एफ. कलाल, फिनिक्स रेसिडेन्शियल स्कूल होणग्याच्या प्राचार्य शरफोनीसा सुबेधार, उपप्राचार्य अनुपमा आणि महाकाली एज्युकेशन सोसायटीचे संचालक लक्ष्मेश्वर हजर होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने उद्घाटन समारंभाला प्रारंभ झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू डॉ. अश्विनी शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर स्पर्धेत सहभागी सर्व संघातील खेळाडूंनी संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या समायोजित मार्गदर्शनपर भाषणानंतर प्रमुख प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे घोषित केले. स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी कर्णधार हुसेन बसरीकट्टी याने स्पर्धेत सहभागी सर्व संघातील खेळाडूंना स्पर्धेची शपथ देवविली. शेवटी फवाड चिक्कोडी यांच्या आभार प्रदर्शनाने उद्घाटन समारंभाची सांगता झाली.
स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात यजमान कनक मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल संघाने प्रतिस्पर्धी केएलई इंटरनॅशनल स्कूल संघाचा 5 -0 असा एकतर्फे पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. यंदा या स्पर्धेत 21 शालेय संघाने भाग घेतला असून ही स्पर्धा सात गटात खेळविली जाणार आहे.
स्पर्धेतील बाद फेरीचे सामने येत्या दि. 1 व 2 ऑगस्टला होतील. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी उपांत्य फेरीचे सामने खेळविले जाणार असून अंतिम सामना येत्या रविवार दि. 7 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे.