ग्रामपंचायतींच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांना एका क्लिकवर मिळावी. तसेच ग्रामपंचायतींचे काम पारदर्शक रहावे, यासाठी ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याकडून ‘पंचतंत्र 2.0’ हे नवे अपग्रेडेड सॉफ्टवेअर लवकरच कार्यान्वित होणार आहे.
ग्रामपंचायतींचे डिजिटलायझेशन करताना ग्राम विकास आणि पंचायत राज खात्याने ‘पंचतंत्र’ आणि ‘पंचमित्र’ ही दोन सॉफ्टवेअर्स सुरू केली. पंचमित्र संकेतस्थळावर ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात येणारी गावे, तिथून मिळणारा कर, सदस्य आणि अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, पंचायतीची संपत्ती आदी माहिती उपलब्ध असते.
तर पंचतंत्र संकेतस्थळावर जमा झालेल्या करांची तपशीलवार माहिती, ग्रामपंचायतीकडून हाती घेण्यात आलेल्या कामांशी संबंधित माहिती आणि पारदर्शक कायद्यान्वये लागू असणारे सर्व नियम पहावयास मिळतात.
पंचतंत्र सॉफ्टवेअर 2016 साली विकसित करण्यात आले असल्यामुळे आता ते जुने आऊट डेटेड झाले आहे. या खेरीज केंद्र आणि राज्य सरकारकडून येणाऱ्या नव्या योजना आणि इतर उपक्रमांमुळे हे सॉफ्टवेअर विकसित (डेव्हलप) करण्याची गरज निर्माण झाली होती. अखेर त्याची प्रक्रिया सुरू झाली असून हे सॉफ्टवेअर लवकरच कार्यान्वित होणार आहे.