बेळगावातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर अन्यायाचा नांगर फिरवण्याचा सरकारने जणू चंगच बांधला असून आता शेतकऱ्यांचा विरोध डावलून देसूर येथून बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव शहरालगतच्या सुपीक पिकाऊ शेत जमिनी सध्या विकासाच्या नांवाखाली जबरदस्तीने भूसंपादित करण्याचा प्रकार घडत असून त्याला समस्त शेतकरी बांधवांचा तीव्र विरोध होत आहे. हालगा -मच्छे बायपास रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उध्वस्त करण्यात आला. शेतकऱ्यांनी त्या विरोधात न्यायालयात धाव घेऊन बायपासला स्थगिती मिळवल्याने ते काम थंड पडले आहे.
देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना त्रास द्यायचे म्हणून की काय सरकारकडून आता बेळगाव ते धारवाड या वादग्रस्त रेल्वे मार्गाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बेळगाव तालुक्यातील देसुर, गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, नागिनहट्टी के. के. कोप्प आदी गावानजीच्या सुपीक तिबार पिके देणाऱ्या जमिनीतून रेल्वे मार्ग काढण्यास शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. सुपीक जमिनी ऐवजी लगतच्या खडकाळ जमिनीतून हा रेल्वेमार्ग काढला जावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन देखील छेडले होते.
सदर आंदोलनानंतर बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्ग उभारणीचे काम थंडावले होते. मात्र गेल्या एक-दोन दिवसापासून नंदीहळ्ळी गावानजीक के. के. कोप्प परिसरात रेल्वे रूळ उभारणीचे साहित्य आणून टाकण्यास सुरुवात झाली आहे. सदर प्रकारामुळे परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण पसरून खळबळ उडाली आहे. तसेच या रेल्वे मार्गाच्या उभारणीस विरोध करण्याच्या दृष्टीने या परिसरातील शेतकरी संघटित होऊ लागले आहेत.
सुपीक शेत जमिनीतून रेल्वे मार्ग न काढता खडकाळ जमिनीतून हा रेल्वे मार्ग काढावा या शेतकऱ्यांच्या मागणीस रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. तथापि बेळगावच्या खासदारांच्या अट्टाहासामुळे वादग्रस्त बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गाची अंमलबजावणी करून गरीब शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा घाट रचला जात असल्याचा आरोप केला जात आहे.