भाषिक अल्पसंख्याक कायद्याची पायमल्ली करणाऱ्या कर्नाटक शासनाने राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. या सरकारला जाग आणून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 8 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणारे ठिय्या आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार येळळूर वासीयांनी केला आहे.
9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन पाळला जातो त्याचे औचित्य साधून बेळगाव सीमाभागात ८ ऑगस्ट रोजी बेळगावात क्रांती घडावी या उद्देशातून येळळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी कागदपत्रांच्या लढाईत सक्रियपणे सहभाग दर्शवून या आंदोलनाला बैठकीत पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी माजी आमदार मनोहर किणेकर ,खजिनदार प्रकाश मरगाळे, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, दत्ता उघाडे,विलास घाडी लक्ष्मी मासेकर आदींनी विचार व्यक्त करत मराठी परिपत्रकाच्या लोकशाही मार्गाने चाललेल्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले.
सुरुवातीला प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्तविक केले तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळळूर विभाग समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी होते.
यावेळी कार्याध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी, मध्यवर्तीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी,माजी ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांगळेश्वरी मंदिरात झालेल्या बैठकीमध्ये मराठी परिपत्रकाच्या लढाईसाठी येळळूर नेहमी समितीच्या पाठीशी राहील असा निर्धार व्यक्त करून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.