मराठी कागदपत्रांच्या मागणीसाठी आणि संघटनात्मक बळ वाढीसाठी तालुका म. ए. समिती आता ॲक्शनमोडमध्ये येणार आहे. मुंबईत भाषिक अल्पसंख्याक कार्यालयासाठी प्रयत्न केलेल्या युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक आणि धनंजय पाटील पियुष हावळ यांचे अभिनंदन,मराठी परिपत्रकासाठी प्रत्येक ग्राम पंचायतीला करणार विनंती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआणि विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचे अभिनंदन असे ठराव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीच्या बैठकीत करण्यात आले.
कॉलेज रोड येथील तालुका म. ए. समिती कार्यालयात शुक्रवारी युवा आघाडीची महत्वाची बैठक अध्यक्ष संतोष मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आगामी काळात नियाेजित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
२७ जून रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी कागदपत्रांसाठी मोर्चा काढला. पण, त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे गावपातळीवर मराठीविषयक जागृती करण्यासाठी चर्चा झाली. प्रत्येक ग्रामपंचायतीला मराठीतून सरकारी कागदपत्रे देण्यात यावी, मराठीतून बसवर फलक लावण्यात यावेत, यासाठी निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार सर्व प्रशासकीय कागदपत्रे मराठीतून मिळावीत, अशी मागणी प्रत्येक ग्रामपंचायत अध्यक्ष, पीडीओ यांच्याकडे करण्याचे ठरले.
यावेळी तालुक्यातील मराठी शाळांची स्थिती सुधारावी, यासाठी प्रयत्न करणे, युवक मंडळांत मराठी विषयक स्वाभीमान जागृत करणे, युवती, महिलांना सरकारी योजनांची माहिती करून देणे, त्यांच्या म. ए. समितीच्या कार्याची माहिती करून देणे, याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
दत्ता उघाडे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष संतोष मंडलिक, सरचिटणीस मनोहर संताजी, आर. एम. चौगुले, माणिक होनगेकर, किरण मोटणकर, सागर बिळगोजी, आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, विनायक पाटील, अनिल पाटील, संजय पाटील, सुरेश राजूकर, महेश जुवेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
अंकुश पाटील, किसन लाळगे, सुनील झंगरुचे, राजू किणयेकर, कंटेश चलवेटकर, अनिल हेगडे आदी उपस्थित होते.