मराठा युवा उद्योजकांना संघटित करून त्यांच्या व्यवसायाबद्दल, त्यांच्या असलेल्या अडीअडचणी दूर करून सर्व प्रकारे सहकार्य करण्यासाठी मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यावतीने आयोजित मराठा युवा उद्योजक मेळावा गेल्या रविवारी उस्फूर्त प्रतिसादात पार पडला.
गणेश कॉलनी संभाजीनगर, वडगाव येथील मराठा सभागृहामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालक राजेंद्र मुतगेकर, शिव संस्कार उद्योग मित्र गोव्याचे अध्यक्ष बी. एम. चौगुले, माजी नगरसेवक नेताजी जाधव, यश ऑटोचे मालक संजय मोरे, निवृत्त प्राचार्य महादेव कानशिडे, आर्किटेक्ट व इंजिनियर आर. एम. चौगुले, माजी मुख्याध्यापक शंकर पुन्नाप्पा चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ पूजन संजय मोरे यांच्या हस्ते तर शिवपूजन राजेंद्र मुतगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन मराठा सेवा संघाच्यावतीने स्वागत करण्यात आले प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किरण धामणेकर यांनी केले.
व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित युवकांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच तो यशस्वी कसा करावा याची माहिती दिली. मराठा समाजातील युवकांनी सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय जिद्दीने चालू केले पाहिजेत असे सांगून आपण आपल्या परीने सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत असेही व्यासपीठावरील मान्यवरांनी स्पष्ट केले.
सदर मेळाव्याचे औचित्य साधून मराठा सेवा संघातर्फे व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा शाल, श्रीफळ, शिल्ड आणि 1001 रुपये बक्षीसा दाखल देऊन गौरविण्यात आले. मेळाव्याचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे सेक्रेटरी मनोहर घाडी यांनी केले. मेळाव्यास बेळगाव शहर परिसरातील बहुसंख युवा उद्योजक उपस्थित होते.