वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या यात्रेनिमित्त खासबाग येथील श्री बसवेश्वर सर्कल येथील बाजारात मोठ्या प्रमाणात कोंबडे विक्रीसाठी दाखल झाले असून या कोंबडे बाजारातील खरेदी-विक्री व्यवहारात सध्या मोठी उलाढाल सुरू आहे.
वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रेनिमित्त देवीला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे या यात्रेसाठी हजारोच्या संख्येने कोंबड्यांची खरेदी केली जाते. श्री मंगाई यात्रेचा मुख्य दिवस उद्या मंगळवार 26 जुलै रोजी असल्यामुळे आज आदल्या दिवशी बेळगाव शहर आणि आसपासच्या तालुक्यातील कोंबडे विक्रेते श्री बसवेश्वर सर्कल खासबाग येथील बाजारात दाखल झाले आहेत. कोंबड्यांना अधिक प्रमाणात मागणी असल्याने त्यांच्या दरातही 10 ते 15 टक्के वाढ झाल्याची माहिती या भागातील व्यापाऱ्यांनी दिली.
बेळगाव लाईव्हशी बोलताना कोंबड्यांचा एक व्यापारी म्हणाला की, श्री मंगाई यात्रेनिमित्त बेळगाव शहरासह आसपासच्या खेडेगावातून तसेच महाराष्ट्रातील कांही गावांमधून विक्रीसाठी कोंबडे खासबागच्या बाजारात आणले जातात. ही यात्रा नावाजलेली सुप्रसिद्ध असल्यामुळे बहुसंख्य विक्रेते आपल्या कोंबड्या घेऊन या ठिकाणी येत असतात. सध्या या बाजारात 300 पासून 2000 रुपयांपर्यंत कोंबड्यांची विक्री होत आहे असे सांगून आजच्या पेक्षा उद्या जास्त उलाढाल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्य एका विक्रेत्याने आपण प्रामुख्याने जवारी प्रकारातील स्वतः पाळलेल्या म्हैसूर नाटी कोंबड्याची विक्री करत असल्याचे सांगून हा कोंबडा महाग असला तरी आपण 600 रुपये इतक्या माफक दरात तो विकत असल्याचे सांगितले. खासबाग बाजारात डीपी, जवारी, गिरीराज आदी विविध प्रकारचे कोंबडे विक्रीसाठी आणण्यात आले आहेत.
गिरीराज हा वजनाने जास्त असल्यामुळे त्याची किंमत कमी आहे, तर नाटी कोंबड्याचा दर जास्त असल्याची माहिती ही संबंधित विक्रेत्याने दिली. यात्रेच्या निमित्ताने सध्या जवारी कोंबड्याचा दर तेजीत असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
श्री मंगाई यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात कोंबडे खरेदी-विक्री pic.twitter.com/SAyDpju9ry
— Belgaumlive (@belgaumlive) July 25, 2022


