महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू झाल्यामुळे लगतच्या बेळगाव जिल्ह्यातील कृष्णा नदी काठावर पुराच्या धोक्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसामुळे गेल्या 24 तासात हिडकल जलाशयाची पाणी पातळी 4 फुटाने वाढली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली असून आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज झाली आहे.
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात धुवांधार मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी महाराष्ट्रातील पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्यामुळे कृष्णा नदी पात्राची पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढली असून नदीकाठावर भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रातील पंचगंगा नदीचा कृष्णा नदीशी संगम होतो. सध्या पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीतही वाढ होऊन पूर येऊ लागला आहे. सध्या कृष्णा नदीमध्ये पंचगंगेतून 71293 क्युसेक्स पाणी येत आहे. याखेरीज राजापूर बॅरेजमधून 56.33 हजार क्युसेक्स आणि दूधगंगेमधून 14.960 क्युसेक्स पाणी कृष्णा नदीच्या पात्रात येत आहे. महाराष्ट्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे घटप्रभा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. घटप्रभेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे गेल्या 24 तासात हिडकल जलाशयातील पाणी पातळी 4 फुटांनी वाढ झाली आहे.
कृष्णा नदीला पूर येऊ लागल्यामुळे मलिकवाड, दत्तवाड, कल्लोळ, येडूर, कारजगा, भोजवाडी, कुन्नूर आदी ठिकाणच्या बंधार्यांवरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने नदीकाठासह संबंधित परिसरातील जनतेला सतर्कतेच आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीवर बारीक लक्ष ठेवून जनतेला कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याची सूचना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि त्या अनुषंगाने सीमावर्तीय भागातील जलप्रवाहांच्या पातळीत झालेल्या वाढी संदर्भात अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. सदर बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहर पोलीस आयुक्त तसेच संबंधितांनी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.