प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ग्रामपंचायत सदस्यांवर स्वतःच पुढाकार घेऊन श्रमदानाने धोकादायक रस्त्याची डागडुजी करण्याची वेळ आल्याची घटना आज बुधवारी सकाळी गणेशपुर रोड येथे घडली. या कृतीमुळे नागरिकास समाधान व्यक्त होत असले तरी प्रशासनाचा धिक्कार केला जात आहे
बेळगावातून राकसकोप मार्गे महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेशपुर रोड पाईपलाईन रस्त्याकडे बेळगाव महापालिकेसह प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष होत आले आहे. परिणामी या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सध्या सुरू झालेल्या पावसामुळे तर खाचखळग्यात पाणी साचून हा रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे.
पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याची दुरुस्ती केली जावी अशी वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अखेर हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य डी. बी. पाटील, अनिल अतिवाडकर, शिवाजी अतिवाडकर, सुरज करडे आणि बाळकिरण दफेदार यांच्या पुढाकाराने आज पाईपलाईन रोड रस्त्याची श्रमदानाने डागडुजी करण्यात आली. या सर्वांनी स्वतः हातात कुदळ -फावडी घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले.
श्रमदानाने सदर रस्ता दुरुस्त केल्याबद्दल डी. बी. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रशंसा होत असली तरी दुसरीकडे प्रशासनाकडून रस्त्याच्या विकास कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. पाईपलाईन रोड हा रस्ता नेमका कोणाच्या हद्दीत येतो हा मोठा प्रश्न आहे. हिंडलगाव ग्रामपंचायत या रस्त्याकडे दुर्लक्ष करते आणि त्याचे अनुकरण बेळगाव महापालिका देखील करते असते.
या दोन्ही प्रशासकीय संस्था सदर रस्ता आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगत हात वर करत असल्यामुळे सदर रस्त्याला कोणी वालीच नाही का? असा संतप्त सवाल ग्रामपंचायत सदस्य डी. बी. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सदर रस्त्याची त्वरित व्यवस्थित दुरुस्त केली नाही तर पुढील काळात या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले जाईल, असा इशाराही दिला आहे.