अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या चार दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली असून उत्तर कर्नाटकातील बेळगावसह 5 जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज’ तर 6 जिल्ह्यांमध्ये ‘येलो’ अलर्ट जारी केला आहे.
उत्तर कर्नाटकातील धारवाड, हावेरी, गुलबर्गा, बेळगाव व बिदर या पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तर तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
यादगिरी, विजयपूर, बागलकोट, शिमोगा, दावणगिरी आणि म्हैसूर या सहा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
किनारी आणि डोंगराळ जिल्ह्यांसोबत उत्तर कर्नाटकातील जिल्हांनाही पावसाचा तडाखा बसला आहे. येथील कांही जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
पश्चिम घाटात झालेल्या पावसामुळे उत्तर कर्नाटकातील काळी नदीच्या पाण्याची पातळी 3 फुटाने वाढली आहे. दांडेली शहरातील रहिवासी भागात आधीच पाणी शिरल्याने नागरिक चिंतेत आहेत. कारवार जिल्ह्यात मोठ्या भूस्खलनाची नोंद झाली आहे. मोठ्या भूस्खलनामुळे महाराष्ट्र आणि गोवा राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.