महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र विधानसभेतील आपल्या पहिल्या वहिल्या भाषणात सीमालढयातील आपल्या जुन्या आठवणीना व सहभागाविषयी उजाळा दिला.
महाराष्ट्र विधानसभेत भाजप सोबत नवीन सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मुंबईत विधानभवनात दोन दिवसीय महाराष्ट्र विधानसभेचा विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेले आहे. यानिमित्ताने सोमवारी अधिवेशनात बहुमत सिद्ध केलं त्यावेळी भाषणा दरम्यान त्यांनी विधिमंडळात बेळगाव प्रश्नाची स्वता केलेल्या आंदोलनाची आठवण ताजी करून दिली.
1986 साली कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी छगन भुजबळ हे वेश पालटून बेळगावात आले होते त्यावेळी एकनाथ शिंदे हे देखील बेळगावात आले होते त्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता मात्र एकनाथ शिंदे यांना आंदोलनामध्ये बेळळारी जेल मध्ये 40 दिवसाचा तुरुंगवास भोगावा लागला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
“1986 च्या कन्नडसक्ती आंदोलनात आमचे नेते छगन भुजबळ हे बेळगावात वेषांतर करून गेले होते तेंव्हा त्यांना कर्नाटकी पोलिसांनी अटक केले व तुरुंगात डांबून मारहाण केली, त्यावेळी भुजबळांनी कर्नाटकी पोलिसांचा प्रतिकार केला. भुजबळांना अटक केल्यानंतर आम्ही शेकडो शिवसैनिकांनी बेळगावच्या आंदोलनात उडी घेतली,त्यानंतर माझ्यासह शंभर कार्यकर्त्यांना कर्नाटकी पोलिसांना अटक करून बेळळारी येथील तुरुंगात डांबले” असे ते म्हणाले.
“आमचे अतोनात हाल केले, तुरुंगातील कर्नाटकी अधिकाऱ्याकडून जेवणातही दुजाभाव केला जायचा, छगन भुजबळ यांचा जामीन आमच्या अगोदर झाला पण आम्हाला शंभर जणाना जामीन करत असताना जाणूनबुजून विलंब केला जात होता” याचीही त्यांनी आठवण करून दिली.