विविध शेतकरी संघटनांकडून 21 जुलै शेतकरी हुतात्मा दिनानिमित्त एससी मोटर्सनजीकच्या ब्रिज खालील चौकाचे ‘रयत चौक’ (रयत सर्कल) असे नामकरण करण्याचा कार्यक्रम आज सकाळी पार पडला. शेतकरी संघटनांच्या नेतेमंडळींच्या हस्ते त्या ठिकाणी नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.
बेळगाव शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरून सांबऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एससी मोटारनजीक ओव्हर ब्रिज खालील चौकाचे आज गुरुवारी ‘रयत चौक’ असे नामकरण करण्यात आले. यावेळी विविध कर्नाटक राज्य रयत संघ आणि विविध रयत संघटनेच्या नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली ‘रयत चौक’ नामफलक लोकार्पण करण्यात आला.
या नामकरण समारंभानिमित्त रयत सर्कल, हुतात्मा शेतकऱ्यांना श्रद्धांजली आदी आशयांचे लक्षवेध तोरण ब्रिजला बांधण्यात आले होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या जनहित विरोधी धोरणाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना कर्नाटक राज्य रयत संघ व हसिरू सेनेचे अध्यक्ष शशिकांत पडसलगी यांनी हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांचे स्मरण चिरकाल होत रहावे यासाठी या चौकाचे नामकरण रैत वृत्त अर्थात रयत सर्कल असे करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच बेळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून पुढच्या 21 जुलै शेतकरी हुतात्मा दिनी या चौकात शेतकरी हुतात्मा स्मारक उभारण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी यांनी आपले समयाची विचार व्यक्त करताना बेळगावात शेकडा 90 टक्के लोक शेतकरी असले तरी दुर्दैवाने आजतागायत या ठिकाणी एकही शेतकरी स्मारक नाही, अशी खंत व्यक्त केली. तसेच आता लवकरच हे स्मारक उभारले जाईल असेही स्पष्ट केले.
याप्रसंगी शेतकरी नेत्यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकाच्या नामकरण समारंभाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.