जुन्या पी. बी. रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज ओव्हर ब्रिज नजीकच्या माणिकबाग ऑटोमोबाईल परिसरात गटारीचे सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन व्यवसाय -धंदे बंद पडल्याने निर्माण झालेल्या समस्याकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी आणि या परिसरातील नागरिकांसह दुकानदार, व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनपा आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
जुन्या पी बी रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज ओव्हर ब्रिज नजीकच्या माणिकबाग ऑटोमोबाईल परिसरातील दुकानदार आणि व्यावसायिकांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. मनपा आयुक्त रुदरेश घाळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. जोराच्या पावसामुळे जुन्या पी. बी. रोड येथील छ. शिवाजी महाराज ओव्हर ब्रिज नजीकच्या माणिकबाग ऑटोमोबाईल परिसरात गटाराचे पाणी तुंबून आसपासच्या परिसरात घरे, दुकाने, वर्कशॉप यामध्ये शिरले आहे. या ठिकाणच्या नाल्याचे बांधकाम व्यवस्थित झाले नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
तुंबलेल्या पाण्यामुळे येथील नागरिक विशेष करून दुकानदार आणि व्यावसायिकांना आपला दैनंदिन काम करणे कठीण झाले आहे. सदर परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे की दुकानावर वर्कशॉप वगैरेंची दारे उघडणेही कठीण झाले आहे. परिणामी गेल्या तीन -चार दिवसांपासून या भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पाणीचपाणी झाल्यामुळे दुकानदार -व्यवसायिकांना आपल्या कामाच्या ठिकाणी जाणे कठीण झाले असून सर्वसामान्य नागरिकांना देखील तुंबलेल्या पाण्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी कामाच्या ठिकाणी शिरल्यामुळे येथील वर्कशॉप गेल्या आठ दिवसापासून बंद आहेत
सदर ठिकाणी पावसाळ्या गटार तुंबून सर्वत्र पाणीच पाणी होण्याचा प्रकार गेल्या कांही वर्षापासून सातत्याने होत असून या संदर्भात वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही. ओव्हर ब्रिज येथील नाल्याचे बांधकाम व्यवस्थित पूर्ण न झाल्यामुळे हा प्रकार घडत आहे. तरी आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जुन्या पी. बी. रोड येथील छ. शिवाजी महाराज ओव्हर ब्रिज नजीकच्या माणिकबाग ऑटोमोबाईल परिसरात गटारीचे सांडपाणी ओव्हरफ्लो होण्याच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करावी, अशा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर, उद्योजक शिवाजी हंगिरगेकर,सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी आदींसह बहुसंख्य दुकानदार, व्यापारी आणि व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना छ. शिवाजी महाराज ओव्हर ब्रिज नजीकच्या माणिकबाग ऑटोमोबाईल परिसरात निर्माण झालेल्या पूर सदृश्य परिस्थितीबद्दल या सर्वांनीच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सदर समस्या त्वरित निकालात काढण्याचे आश्वासन दिले असली तरी आवश्यक कार्यवाही केंव्हा होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.